गुरुदास कामत मुंबई कॉंग्रेसचे "स्टार प्रचारक' 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीवर जाहीरपणे ताशेरे ओढणारे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत हे मुंबई कॉंग्रेसचे "स्टार प्रचारक' झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई कॉंग्रेसने तयार केलेल्या "स्टार प्रचारकां'च्या यादीत कामत यांचे नाव असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार प्रिया दत्त यांचीही नावे या यादीत आहेत.

मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कार्यपद्धतीवर जाहीरपणे ताशेरे ओढणारे माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत हे मुंबई कॉंग्रेसचे "स्टार प्रचारक' झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मुंबई कॉंग्रेसने तयार केलेल्या "स्टार प्रचारकां'च्या यादीत कामत यांचे नाव असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार प्रिया दत्त यांचीही नावे या यादीत आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंह हुडा यांनी पक्षातील अंतर्गत वाद मिटविण्यासाठी केलेल्या मध्यस्थीचा हा सकारात्मक परिणाम असल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. 

"संजय निरुपम यांच्या कार्यशैलीला कंटाळून आपण यंदाच्या पालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरणार नाही. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क साधू नये,' असा मोबाईल संदेश कामत यांनी गेल्या महिन्यात समर्थकांना पाठविला होता. यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही निरुपमांवर टीका करत कॉंग्रेसला रामराम केला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही प्रचारातून बाहेर पडण्याचे सूचित केले होते. या गोंधळाच्या स्थितीला शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून हुडा यांना मुंबईत पाठविण्यात आले. त्यांनी सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रयत्नांना आता यश येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, "स्टार प्रचारकां'च्या यादीत कामत यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मिलिंद देवरा, प्रिया दत्त या निरुपमविरोधी गटातील प्रमुख नेत्यांनाही या यादीत सामील करण्यात आले आहे. 

कामत यांच्याबरोबरच केंद्रातील अनेक दिग्गजांना "स्टार प्रचारक' म्हणून शहरात आणण्याचा मुंबई कॉंग्रेसचा मानस आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी खासदार दिग्विजयसिंह, नवज्योतसिंह सिद्धू, मल्लिकार्जुन खरगे, राजीव शुक्‍ला, आनंद शर्मा या केंद्रातील नेत्यांची नावे या यादीत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या प्रमुख नेत्यांची नावेही "स्टार प्रचारक' म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. 

Web Title: Gurudas Kamat, Mumbai Congress star campaigner