गुरुदास कामत यांना "राजसंन्यासा'चे संकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 एप्रिल 2018

मुंबई - राजधानी मुंबईत कॉंग्रेसचा मजबूत आधार असलेले माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा सततचा धरसोडीचा स्वभाव पाहता त्यांना कॉंग्रेसमधून कायमचा "राजसंन्यास' दिला जाईल, असे संकेत आहेत.

मुंबई - राजधानी मुंबईत कॉंग्रेसचा मजबूत आधार असलेले माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांचा सततचा धरसोडीचा स्वभाव पाहता त्यांना कॉंग्रेसमधून कायमचा "राजसंन्यास' दिला जाईल, असे संकेत आहेत.

कॉंग्रेसच्या सर्व पदांपासून कार्यमुक्‍त झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने पुन्हा कार्यकर्ता म्हणून कामत यांनी स्वतःच्या मतदारसंघात काम सुरू केले. मात्र, त्यांच्या कार्याची पद्धत व व्याप्ती फारच सीमित असल्याने त्यांच्यावर किती दिवस मेहरनजर करायची, अशी चर्चा कॉंग्रेस नेत्यांमध्ये सुरू होती. मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या निवडीनंतर कामत यांनी कॉंग्रेससोबतचे सर्व संबंध तोडले होते. राजकीय संन्यास घेत त्यांनी कोणत्याही इतर पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यांचे समर्थक कृष्णा हेगडे, राजहंस सिंह, समीर देसाई यांनी भाजपमध्ये अगोदरच प्रवेश केला आहे. समीर देसाई हे तर कामत यांचे भाचे आहेत. त्यामुळे, कॉंग्रेसमध्ये राहूनही कामत यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करत असतील, तर कामत यांच्यावर पक्षाने विश्‍वास का ठेवावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

संजय निरूपम यांच्यासोबत मुंबईतील सर्वच कॉंग्रेस नेत्यांनी जुळते घेत पक्षाचा आदेश पाळलेला आहे. मात्र, कामत यांनी निरूपम यांच्याशी फारकत घेत स्वतःच्या लोकसभा मतदारसंघात काम सुरू ठेवल्याने पक्षाच्या आचारसंहितेला ते धरून नसल्याची पक्षश्रेष्ठींची भावना झाल्याचा दावा सूत्रांनी केला. कामत यांना आता कायमचा राजकीय संन्यास देऊन त्यांच्या लोकसभा मतदारसंघात निरूपम यांना उतरवण्याचा निर्णयही कॉंग्रेस घेऊ शकते, असा सूत्रांचा दावा आहे.

Web Title: gurudas kamat rahul gandhi politics