ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर जोशी यांना घोषित

ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार मधुकर जोशी यांना घोषित

मुंबई ः राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये 5 लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री  विनोद तावडे यांनी शुक्रवारी (ता.12) या पुरस्काराची घोषणा केली.

मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे.

प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच. डी आणि एम. फिलचे परिक्षक म्हणून त्यांनी काम केले. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे  200हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत.

सार्थ तुकाराम गाथेची 400 हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध करण्याचे काम जोशी यांनी केले आहे. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील 3 हजार 500 मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ. प्रशांत सुरु, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी जोशी यांची निवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com