हॅकर मनीष भंगाळेला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

दाऊद-खडसेंचे संबंध प्रकरण; बनावट बिल व ई-मेल आयडी बनवल्याचे स्पष्ट

दाऊद-खडसेंचे संबंध प्रकरण; बनावट बिल व ई-मेल आयडी बनवल्याचे स्पष्ट
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारा हॅकर मनीष भंगाळेला आज सायबर पोलिसांनी अटक केली. हा दावा करताना त्याने सादर केलेले सर्व्हिस इन्व्हॉइस, युसेज डिटेल्समध्ये फेरफार केल्याचे तपासात पुढे आले आहे. प्रसिद्धीसाठी हा सर्व प्रकार केल्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मनीष भंगाळे (28) हा ठाणे घोडबंदर येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करणे व सायबर गैरवापर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा लॅपटॉप व मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. या लॅपटॉपच्या साह्याने त्याने हे बनावट फेरफार केल्याचा पोलिसांना संशय आहे. मे 2016 मध्ये भंगाळेने पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असून, त्यांच्यात संभाषण होत असल्याचा दावा केला होता. त्याला पुरावे म्हणून दाऊदची पत्नी महजबीन शेखच्या नावाने पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनीची कथित टेलिफोन बिले सादर केली होती. त्यात 5 एप्रिल 2015 ते 5 मार्च 2016 या कालावधीतील "कॉल डिटेल्स'चा समावेश होता.
सायबर पोलिसांच्या तपासानुसार, भंगाळेने वापरलेला (mehajabeenrhaikh918@gmail.com) हा ई-मेल आयडी भंगाळेनेच बनवला असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय भंगाळेने सादर केलल्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार खडसे यांच्या मोबाईल क्रमांकावर दाऊदच्या घरातून दूरध्वनी गेल्याच्या नोंदी होत्या; पण सायबर पोलिसांनी टेलिफोन कंपनीसोबत केलेल्या पडताळणीत खडसे यांच्या दूरध्वनीवर असा कोणताही दूरध्वनी आला नाही अथवा खडसेंकडून कोणताही दूरध्वनी गेला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याने तयार केलेले सर्व्हिस इन्व्हॉइस, युसेज डिटेल्स बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी भंगाळेने स्पूफिंगचा वापर केल्याचेही तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने भंगाळेला सहा एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्या चार क्रमांकांवरूनही संपर्क नाही
खडसे यांच्यासह आणखी चार भारतीय क्रमांकांवरून दाऊदच्या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्यात आल्याचा दावा भंगाळेने केला होता. भंगाळेने सादर केलेल्या बिलांमध्येही तसा उल्लेख होता; पण पोलिसांच्या तपासात या चार क्रमांकांवरूनही दाऊदला संपर्क साधला नसल्याचे पुढे आले आहे.

Web Title: hacker manish bhangale arrested