अपंग, फेरीवाले, आदिवासींचा पालिकेवर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

तुर्भे  - नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध घटकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या वेळी अपंग, फेरीवाले व आदिवासींचे प्रलंबित प्रश्‍न प्रशासनासमोर मांडण्यात आले. येत्या 15 दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या वेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला. या वेळी पालिका प्रशासनाने 13 तारखेला बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

विशेष म्हणजे आज (ता. 3) अपंगदिनी शहरातील अपंगांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले. या वेळी प्रशासनाने शहरातील अपंगांचे सर्वेक्षण करावे, विकासकामातील राखीव पाच टक्के रक्कम अपंगांच्या विकासासाठी देण्यात यावी, नियमानुसार अपंगांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावेत, आदी मागण्या अपंगांनी प्रशासनापुढे मांडल्या. 

फेरीवाल्यांवर होणारी कारवाई तत्काळ थांबवावी, त्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात यावी, तसेच शहर व प्रभाग फेरीवाला समिती त्वरित स्थापन करावी, आदिवासींसाठी घरकुल योजना राबवावी, ज्यांना घरकुलाचा ताबा मिळाला आहे, अशाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यात यावे, आदिवासींच्या मुलांना मोफत बस पास सुरू करावा; आदी मागण्यांसाठी संयुक्त आंदोलन करण्यात आले होते. या वेळी विविध घटकांतील हजारो जण उपस्थित होते. 

या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत येत्या 13 तारखेला पालिका आयुक्तांची भेट घेऊन संबंधित घटकांच्या प्रश्‍नाबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. जर प्रशासकीय स्तरावर प्रश्‍न सुटले नाहीत, तर येत्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केले जातील. तसेच मंत्रालयीनस्तरावर आपण पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. 

या वेळी युनियनचे ऍड. सुरेश ठाकूर, बाळकृष्ण खोपडे, शंकर पडुलकर आदी उपस्थित होते. प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर दुपारी आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण खोपडे यांनी दिली. 

येत्या 13 तारखेला आयुक्तांच्या आदेशाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची या विविध घटकांच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये संबंधित घटकांच्या प्रश्‍नावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. 
- प्रकाश वाघमारे,  उपायुक्त, मालमत्ता विभाग 

Web Title: Handicap street vendors tribal march on the municipal