‘जीआय’पासून हापूस बागा दूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

अलिबाग : कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एक टक्का बागायतदारांनी अशी नोंदणी केली आहे.

विशिष्ट चव आणि रंगासाठी हापूस आंबा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला जीआय मानांकन मिळाले आहे. बागायतदारांनी त्यांच्या बागेची जीआय मानांकन नोंदणी करावी, असा आदेश गेल्या वर्षी राज्य सरकारने काढला होता. ही नोंदणी डॉक्‍टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकार संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित- जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था, केळशी, दापोली यांच्याकडे करता येणार आहे; परंतु या चारही संस्था जिल्ह्याबाहेर असल्याने नोंदणीला प्रतिसाद मिळत नाही.

जीआय मानांकन म्हणजे काय?
एखादा विशिष्ट पदार्थ किंवा एखादे विशिष्ट उत्पादन एखाद्या विशिष्ट भागातून आलेले असेल आणि तो पदार्थ किंवा ते उत्पादन त्या विशिष्ट भागाचे प्रतिनिधित्व करत असेल, तर त्याला भौगोलिक मानांकन कायद्याअंतर्गत बौद्धिक संपदेचा दर्जा दिला जातो. 

जीआय मानांकनासाठी रायगडमध्ये कोणत्याही संस्थेला नियुक्त केलेले नाही. शासनाने अद्याप सक्ती केलेली नाही. त्यामुळे नोंदणीकडे बागायतदारांचे अद्याप लक्ष नाही. आतापर्यंत अवघी एक टक्का नोंदणी झालेली असावी. 
- चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, महाराष्ट्र आंबा उत्पादक संघटना

जीआय मानांकन नोंदणीसाठी अवघा चार हजार रुपये खर्च येतो. ७/१२ उताऱ्यावर हापूस आंबा अशी नोंद असावी. बागेचे भौगोलिक स्थान निश्‍चित करण्यासाठी अक्षांश, रेखांश दर्शविणारा नकाशा जोडून पाठविल्यास काही दिवसांतच आपल्याला जीआय मानांकन मिळते.

- डॉ. जगन्नाथ पाटील, जीआय मानांकन बागायतदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hapoos Baug stay away From GI