‘या’ कारणांमुळे गाजले २०१९

नववर्ष
नववर्ष

पनवेल : ३१ डिसेंबर... ‘वर्ष कसे संपले, हे समजलेच नाही’, हे वाक्‍य प्रत्येकाच्या तोंडात आल्याशिवाय राहत नाही. कॅलेंडरचे पान बदलता बदलता संपूर्ण कॅलेंडरच बदलायचा दिवस आला. घड्याळातील काटा आणखी पुढे गेला आणि तुमच्या-आमच्या आयुष्यातील आणखी एक वर्ष सरत आले. 

हे वर्ष सरता सरता जिल्ह्यावरच नव्हे; तर देशावर मळभ घेऊन आले होते. मोदी सरकारची महागाई, महिलांवरील अत्याचार, मुलींच्या जन्मात घट, आंदोलने, निषेध, दरोडे, चोऱ्या, अपघात अशा एक ना अनेक कारणांमुळे हे वर्ष प्रत्येकाच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. देशावरचे हे मळभ मन व्यथित करून सोडणारे तर आहेच; पण त्याचबरोबर सर्वांच्याच मनावर एक भळभळणारी जखम करणारे आहे. जिल्ह्यात येऊ पाहत असलेल्या प्रकल्पांमुळे आलेल्या जिल्ह्याच्या श्रीमंतीबरोबरच आपण विचारांची श्रीमंती मात्र हरवून बसलो आहोत. त्यामुळे आता येणारे वर्ष तरी मोकळे आकाश घेऊन येईल का, हा सवाल आता प्रत्येकाच्या डोळ्यात दिसून येत आहे. 

केवळ विनयभंग किंवा बलात्काराचे व्रण मनावर कोरलेल्या त्या अभागी युवतींसाठीच नव्हे, तर बऱ्याच महिलांसाठीही हे वर्ष काळजावर दगड ठेवून गेले आणि म्हणूनच सरत्या वर्षात घडलेल्या अमानुष घटनांना मागे सोडून येत्या वर्षाचा विचार करूया.  

गुन्ह्यांची संख्या
जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण २९१४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत; तर नवी मुंबई परिमंडळ- २ क्षेत्रात २४५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरवर्षी गुन्ह्यांमध्ये होणारी वाढ बघता लोकांची मानसिकता बदलणे देशाला जमलेले नाही असेच दिसून येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी प्रथम गुन्हा करण्याबाबतची मानसिकता बदलायला हवी. केवळ कायदा कठोर करून त्यांच्यात बदल होईल अन्‌ देशातील महिला सुरक्षित होतील, असा विश्‍वास ठेवणेच चुकीचे. इतिहासात डोकावून पाहिले तर महिलांवरील अत्याचार त्या काळातही बाईच्या नशिबातून चुकले नाहीत आणि आजही चुकलेले नाहीत. फरक फक्त इतकाच; की त्या काळातील अत्याचारांचे प्रमाण कमी होते. मात्र सरत्या वर्षानुसार अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. तसेच अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी वर्षभरात ५७ उपोषणे, १४ मोर्चे; तर १७ आंदोलने करण्यात आली. 

पोलिस उपायुक्त कार्यालय 
पनवेल परिमंडळ २ मधील एकूण गुन्ह्यांची संख्या 
                                             (२०१८)                                          (२०१९) 

 मालमत्तेचे गुन्हे                       ९४८                                              ८७९ 
महिला विषयक गुन्हे                  २७७                                              २९२ 
अपघाती गुन्हा                           ३५२                                              ४१० 
आर्थिक गुन्हे                             २६७                                               २५७ 
इतर गुन्हे                                 १८३                                               २४२
एकूण                                       २४२०                                            २४५५

राजकीय वारे
या वर्षात निवडणुकीचे वारे जोरदार असल्याचे पाहायला मिळाले. पनवेल, उरण तालुक्‍यातील खासदारकी व आमदारकीची निवडणूक चांगलीच रंगली. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांना मात देत विजय मिळविला; तर विधानसभा निवडणुकीत जवळपास ९० हजारांच्या मताधिक्‍याचा टप्पा पार करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापच्या हरेश केणी यांना मागे टाकले. तर उरणमध्ये महेश बालदी यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला मात्र जोरदार धक्‍का बसला.  

रखडलेली कामे 
न्हावा- शेवा सागरी मार्ग
बेलापूर-पेंधर मेट्रो
जेएनपीटी महामार्ग
शिवसमर्थ पुतळा
नवघर-करळ उड्डाणपूल

उरण-खारकोपर 
रेल्वे मार्ग 
करंजा जेट्टी
नवी मुंबई विमानतळ 
प्रकल्पबाधित व झोपडपट्टी पुनर्वसन

सांस्कृतिक चळवळ
नुकत्याच खारघरमध्ये झालेल्या ‘विराग मधुमालती’ यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने गिनीज बुकात नोंद करून देशाचे नाव उंचावले आहे. चीनचा विक्रम मोडीत काढून तब्बल ८९५ तास गायनाचा कार्यक्रम खारघरमध्ये संपन्न झाला. याचा केवळ खारघरकरांनाच नव्हे; तर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. 

महागाईचा कहर 
रोजच्या जेवणात सर्वात महत्त्वाचा ठरणाऱ्या कांद्याचे भाव भाव गगनाला भिडविल्याने गृहिणींचे महिन्यांचे बजेटच कोलमडून गेले. केंद्र सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सामान्यांवर उपासमारीची वेळ आणली; तर नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे जनतेच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com