हापूसचे दर ४० टक्के घसरले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

हापूसऐवजी स्वस्त दर्जाच्या आंब्याला ग्राहकांनी पसंती दिल्यामुळे भाव घसरले आहेत...

नवी मुंबई - फळांचा राजा म्हणजे कोकणचा हापूस अशी ओळख असलेल्या आंब्याला यंदा केरळ, कर्नाटकच्या आंब्यांकडून कडवी टक्कर मिळत आहे. परराज्यातील परंतु मूळचा कोकणचा असलेल्या या आंब्यांची चव आणि कमी असलेल्या किमती कोकणातील हापूसला मात देत आहेत. यामुळे या आंब्याची किंमत जवळपास चाळीस टक्‍क्‍यांनी घसरली आहे. 

मागील अनेक वर्ष पिढ्यान्‌पिढ्या कोकणातील हापूस आंब्याची बाजारात मक्तेदारी होती. कोकणातील लाल मातीत आणि कातळावर आलेल्या हापूसची चव कोणत्याच आंब्याला आली नाही. त्यामुळेच हापूस आंब्याची बाजारात असलेली मक्तेदारी कुणालाच तोडता आली नव्हती. यंदा मात्र ही परिस्थिती बदलली आहे. कोकणातील हापूसची कलमे या राज्यामध्ये नेऊन तेथे उत्पादन झाल्याने हा आंबा चवीस कोकणातील हापूससारखाच लागत आहे. तसेच तुलनेने किमतीही कमी असल्याने नागरिकांनी याच आंब्यांकडे मोर्चा वळविला आहे. 

महत्त्वाचे म्हणजे कोकणातील आंबे कोणते आणि केरळ आणि कर्नाटकमधील कोणते हे निष्णात असलेल्या हापूस आंबाप्रेमींनाही ओळखणे कठीण बनले आहे. दोन्ही आंब्यांच्या किमतीमध्ये प्रतिकिलोला जवळपास ४० रुपयांचा फरक आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आवकही झाली आहे. यामुळे कोकणातील हापूस आंब्याला भाव देत नसल्याने दरही उतरले आहेत. 

गेल्या वर्षी हापूसच्या पाच डझनाच्या पेटीचा दर अडीज ते चार हजारपर्यंत होता. तो आता दीड ते साडेतीन हजारपर्यंत आला आहे. परराज्यातील आंब्यांमुळे कोकणातील हापूसला फटका बसत असून, आंब्याचे दर कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Web Title: hapus mango rate dropped to 40 percent