आश्रमशाळा अधीक्षिकेकडून आदिवासी मुलींची छळवणूक

कावळे आश्रमशाळेतील मुलींच्या होणाऱ्या छळवणुकीबाबत प्रकल्प कार्यालयात ठिय्या.
कावळे आश्रमशाळेतील मुलींच्या होणाऱ्या छळवणुकीबाबत प्रकल्प कार्यालयात ठिय्या.

मुंबई : आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कावळे येथील शासकीय आश्रमशाळेतील अधीक्षिकेकडून वारंवार छळवणूक होत असल्याची तक्रार निवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत अधीक्षिकेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत न जाण्याचा पवित्रा या विद्यार्थिनींनी घेतला आहे.

पहिली ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू असलेल्या कावळे येथील आश्रमाच्या अधीक्षिकेकडून मुलींना बाथरूम साफ करणे, पालकांना भेटू न देणे, झाडू मारणे व उठाबशा काढणे अशा प्रकारे छळवणूक सुरू असून "तक्रार कुठेही करा, माझे काहीही वाकडे होणार नाही,' अशा भाषेत बोलणाऱ्या या अधीक्षिकेकडून मुलींना भेटण्यासाठी वसतिगृहात आलेल्या पालकांनाही मुलींना भेटू देत नसल्याच्या तक्रारी वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनींनी व पालकांनी केल्या आहेत.

पालकवर्ग मुलींना भेटून गेल्यानंतर सदर अधीक्षिका मुलींना कधी 100; तर कधी 200 उठाबशा काढण्यास सांगत असल्याचे विद्यार्थिनींनी सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. तसेच जोपर्यंत अधीक्षिकेची बदली अथवा त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याची भूमिका या विद्यार्थिनींनी घेतली आहे. 

प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर ठिय्या 
प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी विद्यार्थिनींसमवेत त्यांचे पालक व आदिवासी युवा संघ, विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या संघटनांनी सदर मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत अधीक्षिकेवर कारवाईच्या मागणीसाठी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ठिय्या मांडून आंदोलन केले.

दरम्यान प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोनवणे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अधीक्षिका यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार असल्याचे आश्वासन या वेळी विद्यार्थिनी आणि पालकवर्गाला दिले. या वेळी आदिवासी युवा संघाचे अध्यक्ष एकनाथ दरोडा, सचिव महेश भोये, हेमंत घेगड, नरेश मुकणे यांच्यासमवेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष दामू मौळे, जव्हार पंचायत समितीचे माजी सभापती ज्योती भोये आदी उपस्थित होते. 


6 ते 9 ऑगस्ट दरम्यान मी रजेवर होते. या दिवसांत मी दुसऱ्या महिलेकडे पदभार दिला होता. घडलेल्या घटनेत माझा काहीही दोष नसून आपल्या विरोधात मोठे राजकारण सुरू आहे. 
- पी. व्ही. जोगदंड,
अधीक्षिका, कावळे आश्रमशाळा 

मी पालक म्हणून माझ्या मुलीस भेटण्यास अनेक वेळा गेली होती. एक महिला असून मला आतमध्ये जाऊन भेटण्यास नकार दिला. 
- लता भोये,
पालक, काशिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com