नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे शरीरसुखाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकाने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनी वाडी या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला.

ठाणे - सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असल्याने नोकरी टिकवण्यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे सहकारी सुरक्षारक्षकाने चक्क शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टिकुजिनी वाडी या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सायंकाळी घडला.

याप्रकरणी, पीडित महिलेशी गैरवर्तन करून धमकावत विनयभंग केल्याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात रणवीरसिंग नाहरसिंग सणमेदा (54, रा. आनंदनगर) या सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, टिकुजिनी वाडी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळेच गेली काही वर्षे येथे असा अंधाधुंद व बेशिस्त कारभार सुरू असल्याने महिला कर्मचारी व पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. तेव्हा पोलिसांनी याबाबत वेळीच हस्तक्षेप करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. 

टिकुजिनी वाडी येथे काम करणारी 32 वर्षीय पीडित महिला सुरक्षारक्षकाला कर्तव्य बजावत असताना सणमेदा याने पीडितेला स्वच्छतागृहाकडे बोलावले. तसेच, येथील सुरक्षारक्षक एजन्सी बदलणार असून तुला नोकरी टिकवायची असेल, तर आपल्याशी शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. याला पीडितेने विरोध करताच आरोपी सणमेदा याने तिचा विनयभंग केला. हा प्रकार तेथे कर्तव्य बजावत असलेल्या दुसऱ्या एका सुरक्षारक्षकाने पाहिला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

टिकुजिनी वाडीचा कारभार सुधारा : मनसे 
गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी अंधाधुंद आणि बेशिस्त कारभारामुळे प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. ज्या इम्पिरियल सिक्‍युरिटी अँड फॅसिलिटीज मॅनेजमेंट या मराठी माणसाच्या सुरक्षारक्षक कंपनीचा ठेका कोणतेही ठोस कारण न देता कंत्राट तडकाफडकी रद्द केले आहे.

टिकुजिनी वाडी व्यवस्थापनाने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harassment of a woman to keep her job