हार्बरचा मालगाडी मार्ग झोपडपट्ट्यांनी रोखला 

तुषार अहिरे - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - हार्बर मार्गावर पोर्ट ट्रस्ट यार्ड ते कुर्ल्यादरम्यान मालगाडीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारण्याची वाट झोपडपट्ट्यांनी अडवली आहे. या मार्गावरील 20 टक्के झोपडीवासीयांचे पुनर्वसन न झाल्याने हार्बर मार्गावरील दहा लाखांहून अधिक प्रवाशांना आणखी काही वर्ष "मालगाडी'च्या अडथळ्याचा त्रास सोसावा लागेल. 

मुंबई - हार्बर मार्गावर पोर्ट ट्रस्ट यार्ड ते कुर्ल्यादरम्यान मालगाडीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारण्याची वाट झोपडपट्ट्यांनी अडवली आहे. या मार्गावरील 20 टक्के झोपडीवासीयांचे पुनर्वसन न झाल्याने हार्बर मार्गावरील दहा लाखांहून अधिक प्रवाशांना आणखी काही वर्ष "मालगाडी'च्या अडथळ्याचा त्रास सोसावा लागेल. 

मालगाड्यांच्या वाहतुकीसाठी पहाटे दोन ते चार तासांचा अवधी मुंबई बंदराला रेल्वेने दिला आहे. बंदरातून दिवसाला 15 ते 16 मालगाड्यांची वाहतूक हार्बर मार्गावरून होते. बहुतेक वेळा वडाळा स्थानकाजवळ लोकलला थांबवून मालगाडीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी काही वर्षांपूर्वी पोर्ट ट्रस्ट यार्ड ते कुर्ल्यादरम्यान स्वतंत्र मार्ग उभारण्याचा प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेने संयुक्तपणे हाती घेतला; पण पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या अडथळ्यांमुळे या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. 

या मार्गावरील झोपड्यांची संख्या ही 1600च्या आसपास आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. "या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेला निधी आम्ही रेल्वेकडे दिला आहे. एमएमआरडीएने आतापर्यंत 80 टक्के झोपडीवासीयांचे पुनर्वसन केले आहे. मध्यंतरी न्यायालयाच्या स्थगितीमुळे या प्रकल्पाचे काम थांबले होते. हा प्रकल्प झाल्यास मालगाडीची वाहतूक स्वतंत्र मार्गावरून होईल,' असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी सांगितले. 

मागील आठवड्यात हार्बर मार्गावरील गुरू तेग बहाद्दूर नगर (जीटीबी) स्थानकावर दिल्लीला जाणारी मालगाडी घसरल्याने लोकल सेवा 17 तास ठप्प झाली होती. पोर्ट ट्रस्ट बंदरातून निघालेल्या 44 डब्यांच्या या मालगाडीचे शेवटचे तीन डबे घसरले होते. 

मालगाडीचा स्वतंत्र मार्ग 
- मार्गाची लांबी ः 4.41 कि.मी 
- प्रकल्पाचा खर्च ः 176 कोटी 81 लाख 

Web Title: Harbor restricted train route slums