आजारांची बर्फाळ छाया कायम 

नेत्वा धुरी 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

शहरात आरोग्यास अपायकारक बर्फ सर्रास विकला जात आहे. हे बर्फमिश्रित पेय घेतल्यास नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई -  अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाच्या मुंबईतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने मुंबईतील रस्त्यांवरील बर्फाची तपासणी रखडली आहे. यापूर्वी झालेल्या तपासणीत शहरातील 98 टक्के बर्फ खाण्यायोग्य नसल्याचे आढळले होते. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी असते. तपासणी होत नसल्याने आजही शहरात आरोग्यास अपायकारक बर्फ सर्रास विकला जात आहे. हे बर्फमिश्रित पेय घेतल्यास नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या बर्फाची दरवर्षी पालिकेचा आरोग्य विभाग आणि एफडीएच्या पथकामार्फत तपासणी होते. दूषित बर्फ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे फारसे अधिकार पालिकेकडे नसल्याने प्रमुख कारवाई एफडीएमार्फत केली जाते. एफडीएची पथके दरवर्षी बर्फाच्या कारखान्यांची तपासणी करतात. रस्त्यांवर विकल्या जाणाऱ्या बर्फाचे नमुनेही गोळा केले जातात. मात्र, एफडीएच्या अन्न विभागाचे 80 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने यंदा असे नमुने गोळाच करण्यात आलेले नाहीत. निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या विभागाचे सर्व 12 सहायक आयुक्त आणि 36 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांपैकी 25 जणांचा समावेश आहे, असे एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. 

कर्मचारी निवडणुकीच्या कामाला 
- 12 पैकी 12 सहायक आयुक्त 
- 36 अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांपैकी 25 जण 

अपायकारक बर्फ 
- रस्त्यावर विकली जाणारी सरबते, बर्फाचा गोळा बनवण्यासाठी वापरला जाणाऱ्या बर्फात यापूर्वी "ई-कोलाय' हा विषाणू आढळला होता. 
- "ई कोलाय' असलेले बर्फमिश्रिय पेये घेतल्यास अतिसार, मुत्रमार्गातील संसर्ग आदी आजार होऊ शकतात. 
- या आजारांवर वेळीच उपचार न झाल्यास प्रसंगी जीवही जाऊ शकतो. 

गेल्या वर्षी उन्हाळ्यात झालेली कारवाई 
- महानगरपालिकेच्या पथकाने दूषित बर्फाच्या 410 नमुन्यांची तपासणी केली होती. त्यापैकी 400 नमुन्यांमध्ये "ई-कोलाय' आढळला होता. 
- पालिकेने 14 हजार 700 किलो, तर एफडीएने 2500 किलो दूषित बर्फ नष्ट केला होता. 
- दूषित बर्फ बनवणाऱ्या आठ कारखान्यांवर कारवाई झाली होती. 

Web Title: harmless ice is being sold in mumbai

टॅग्स