हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का? शिवसेनेची भाजपची टीका

हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का? शिवसेनेची भाजपची टीका

मुंबई - महाराष्ट्रात पालघर येथे साधूंच्या हत्येनंतर वेदनेने तळमळ करणाऱ्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप सांधूंच्या हत्येनंतर हिंदुत्वाचा शंखनाद करीत होता. हाथरस आणि बलरामपूर प्रकरणानंतर हिंदुत्ववाद्यांचा शंखनाद थंड पडला का? असा खडा सवाल शिवसेनेनं केला आहे

पालघरमध्ये काही महिण्यांपूर्वी दोन साधूंची जमावाने ठेचून हत्या केली होती. त्यावेळी योगी अदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. आता हाथरस प्रकरणानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै सामनामधून आता उत्तरप्रदेश सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येत राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली आहे, पण उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ वगैरे नसून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत ‘जंगलराज’ आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, पण तरुणींवर बलात्कार आणि खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहेत. हाथरसमध्ये 19 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार व नंतर खून झाला. त्यानंतर देशात गदारोळ उडाला आहे. मरणाच्या दारात असताना तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आता उत्तर प्रदेशचे सरकार म्हणते बलात्कार वगैरे सगळे झूठ आहे. पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्काराचे प्रकरण झाले, पण ना दिल्लीतील अश्रूंचा बांध फुटला ना योगी सरकारच्या डोळय़ांच्या कडा ओलावल्या. बलात्कार झालाच नाही तर विरोधकांनी बोंबलायचे कशाला? असे सरकारच बोंबलत आहे. बलात्कार झालाच नाही, तर रात्रीच्या अंधारात त्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी पेट्रोल ओतून का जाळला? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला निघालेल्या राहुल गांधी यांना अडवलेच, पण त्यांना कॉलर पकडून धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडले. देशातील एका प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यास असे वागवणे, अपमानित करणे हे लोकशाहीवर ‘गँगरेप’ होत असल्याचेच लक्षण आहे. राहुल गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी हे महान इंदिरा गांधींचे नातू व तडफदार राजीव गांधींचे सुपुत्र आहेत. इंदिरा व राजीव गांधी यांनी देशाच्या सार्वभौमत्वासाठी हौतात्म्य पत्करले, पण देशासाठी रक्त तर सोडाच, घामाचा, त्यागाचा एक थेंबही ज्यांनी सांडला नाही अशा सत्ताधीशांच्या आदेशाने राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्यात आला. संपूर्ण गाव बंदूकधारी पोलिसांनी घेरून ठेवले आहे. जिल्हाधिकारी पीडितेच्या कुटुंबीयांना सरळ सरळ धमकावत असल्याची टेप समोर आली आहे.

‘‘आज हे मीडियावाले गावात आहेत. ते दोन दिवसांत जाणारच आहेत. मग तुम्ही काय करणार? तुम्हाला आमच्याशीच बोलावे लागेल. तेव्हा आता तोंड बंद ठेवा!’’ असे धमकावणाऱया अधिकाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. ते भगव्या कपड्यात वावरतात. पंतप्रधान मोदी हे तर फकीर आहेत, पण मोदी यांना जगातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा आहे. योगी यांनाही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही. बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे नराधम कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांनाही सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून कोणत्याही रूढी-परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती महिला देहाची, हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने, वेदनेने धरणीत गडप झाली असेल. महाराष्ट्रातील पालघरात दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱया योगींची विधाने आम्ही पाहिली आहेत. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? योगींच्या राज्यात पोलिसांचे ‘ऍण्टी-रोमिओ’ पथक तयार केले आहे. बागेत प्रेम करणाऱया तरुण-तरुणींना पोलीस लखनौ, कानपुरात मारतात, पण मुलींचे बलात्कार करून खून करण्याची पूर्ण मुभा आहे. मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजप प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या, पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे सर्व लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहेत. हे संतापजनक आहे. त्या मुलीने बलात्कार झाल्याचे कॅमेऱयासमोर सांगितले. त्या मृत्यूपूर्व जबानीस काहीच अर्थ नाही काय? त्या मुलीच्या अब्रूचे रक्षण करता आले नाही व तिचे प्राणही वाचवता आले नाहीत अशा उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसला निघालेल्या राहुल गांधींवर मात्र हल्ला केला आहे. हे कायद्याला धरून नाही. आम्हाला आश्चर्य वाटते ते उत्तर प्रदेशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे. राहुल गांधींवर पोलिसांचा हल्ला होत असताना ‘योगी’राज्यातील तमाम विरोधी पक्ष संस्कृती व कायद्याचे हे वस्त्रहरण उघडय़ा डोळय़ांनी पाहत होते. मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून ‘कर्कश’ मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे, समाज नपुंसक बनला आहे व मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱया ए अबले, आम्हाला माफ कर!

हाथरस प्रकरणावरून अशा पद्धतीने शिवसेनेने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्य नाथ यांच्यावर तीव्र शब्दात टीका करण्यात आली आहे. 1-2 दिवसांपासून शिवसेनेच्या विविध नेते आणि कार्यकर्त्यांकडून हाथरस घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com