रस्ते फेरीवाल्यांचेच!

राजेश मोरे 
बुधवार, 3 मे 2017

ठाणे - शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ऐन भरात आली असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल रस्ते नागरिकांसाठी रुंद करत आहेत की फेरीवाल्यांसाठी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर सध्या फेरीवाल्यांचेच साम्राज्य आहे. प्रभाग समितीतील अधिकारी, काही लिपिकांच्या जोरावर हा खुला बाजार मांडला जात आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही फेरीवाल्यांच्या या वाढत्या बस्तानाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.

ठाणे - शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम ऐन भरात आली असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल रस्ते नागरिकांसाठी रुंद करत आहेत की फेरीवाल्यांसाठी, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर सध्या फेरीवाल्यांचेच साम्राज्य आहे. प्रभाग समितीतील अधिकारी, काही लिपिकांच्या जोरावर हा खुला बाजार मांडला जात आहे. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारीही फेरीवाल्यांच्या या वाढत्या बस्तानाकडे दुर्लक्ष करत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.

रेल्वेस्थानकासह सॅटीसचा परिसर फेरीवाल्यांना आंदण देणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चार महिन्यांपूर्वी जोरदार दणका दिला होता. नौपाडा प्रभाग समितीतील तब्बल तीन लिपिकांची बदली करण्यात आली होती. तसेच या परिसराची जबाबदारी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती, तरीही आयुक्तांचे आदेश धाब्यावर बसवून नौपडा प्रभाग समितीतील अधिकाऱ्यांनी पुन्हा रेल्वेस्थानक परिसर फेरीवाल्यांना आंदण दिला आहे. 

अतिक्रमण विभागाच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरदिवशी रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करणे शक्‍य नसते. अशावेळी महापालिकेकडून स्थानिक पातळीवर लिपिक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून फेरीवाल्यांवर कारवाई होणे अपेक्षित असते. मुळात वर्षानुवर्षे या फेरीवाल्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात कुचराई होत असल्याने फेरीवाल्यांचे फावते. अरुंद झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना ठाण्यातील लाखो नागरिकांना मात्र याचा त्रास होतो. दुपारनंतर या फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढते. अशावेळी सहायक आयुक्तांसह प्रभाग स्तरावरील अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी उपायुक्तांचीही नेमणूक करण्यात आली आहे; पण आयुक्तांची ही यंत्रणा सध्या केवळ कागदावर आहे. 

निवडणुकीच्या काळात महापालिकेतील सर्वच मनुष्यबळ निवडणुकीच्या कामात गुंतले होते. याची संधी साधत नौपाडा प्रभागातील नियमित कर्मचाऱ्यांबरोबर संधान साधून गोखले रोड, शिवाजी पथ, जुना रेल्वेस्थानक परिसर, सॅटीस परिसराचा ताबा फेरीवाल्यांच्या दादांनी घेतला आहे. सायंकाळी नियमितपणे अतिक्रमणविरोधी पथकाची गाडी येथून फेरफटका मारून जाते. त्या वेळी काही काळा फेरीवाल्यांची पळापळही होते. त्यानंतर पुन्हा हा रस्ता फेरीवाल्यांच्या ताब्यात जात आहे.

हे रस्ते फेरीवाल्यांच्या ताब्यात
सध्या शहरातील रेल्वेस्थानक रस्ता, शिवाजी पथ, गोखले रोड, जांभळी नाका, वागळे इस्टेट येथील किसननगर परिसर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, शिवाईनगरचा नाका, मानपाडा येथील नाका, वाघबीळ नाका असे सर्वच नाके या फेरीवाल्यांनी ताब्यात घेतले आहेत. मागील वर्षी काही प्रमाणात या फेरीवाल्यांवर नियंत्रण होते; पण आता प्रभाग समितीवर अर्थपूर्ण समीकरण जुळल्याने मिळेल त्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपली पथारी पसरली आहे.

फेरीवाला धोरणाला ‘तारीख पे तारीख’
फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केल्यानंतर फेरीवाल्यांच्या नेत्यांकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले जाते. फेरीवाला धोरण जाहीर करणाऱ्या समितीत महिलांना प्राधान्य द्यावे, असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे नव्याने महापालिकेकडून समितीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या समितीच्या नावाखाली फेरीवाल्यांनी मात्र संपूर्ण शहरच आपल्या ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. प्रभाग समितीवरील काही लिपिकांच्या साटेलोट्यांमुळे सर्व रस्तेच या फेरीवाल्यांना आंदण मिळाले आहेत. मुळात शेकडो लोकांना विस्थापित करून रस्ते रुंद केले जात आहेत. अशा वेळी रुंद केलेल्या रस्त्यांचा ताबा फेरीवाले घेणार असतील, तर रस्ता रुंदीकरणाचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.

Web Title: Hawkers encroachment on road