का होते आक्षी किनाऱ्याची धूप ?

अलिबाग : समुद्राच्‍या उधाणामुळे आक्षी किनाऱ्याची मोठी धूप झाली अाहे.
अलिबाग : समुद्राच्‍या उधाणामुळे आक्षी किनाऱ्याची मोठी धूप झाली अाहे.

अलिबाग (बातमीदार) : समुद्राच्या उधाणामुळे आक्षी किनाऱ्याची मोठी धूप झाली असून, नजीकच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने उभारलेला टेहळणी मनोरा जीर्ण झाल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. सरकारकडून आवश्‍यक सोई-सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे पर्यटनाला फटका बसण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा आणि नवीन टेहळणी मनोरा बांधण्याबाबत पाठपुरावा करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याबद्दल स्थानिकांत नाराजी आहे.

अलिबाग तालुक्‍यातील आक्षी गाव पर्यटनासह ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. या गावात प्राचीन काळातील शिलालेख असून, निसर्गरम्य समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे राज्य आणि देश-विदेशातील पर्यटक आक्षीला आवर्जून भेट देतात. आक्षी समुद्र किनाऱ्यावर वर्षाला सुमारे पाच लाख पर्यटक येतात. पर्यटकांसाठी ग्रामपंचायतीने अनेक सोई-सुविधा दिल्या आहेत. निवासासाठी कॉटेज, घरगुती पद्धतीचे शाकाहारी-मांसाहारी भोजन मिळत असल्याने शनिवार-रविवारी, अन्य सुट्टीच्या दिवशी आणि मोठ्या सुट्ट्यांच्या हंगामात आक्षी समुद्र किनारा पर्यटकांनी फुलून जातो.

पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आक्षी समुद्र किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याबाबत सरकार उदासीनच आहे. सुमारे २५ मीटरचा किनारा उधाणामुळे वाहून गेला असून वनराईचे नुकसान झाले आहे. किनाऱ्यालगतच्या १५० हून अधिक घरांना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांनी आक्षी किनाऱ्यावर बंधारा बांधण्याबाबत सरकारकडे सतत पाठपुरावा केला, परंतु धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम लालफितीत अडकल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

टेहळणी मनोरा कोसळण्याची भीती
आक्षी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने टेहळणी मनोरा उभारला आहे, परंतु पाच वर्षांतच या मनोऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. मनोरा मोडकळीस आला असून, छपरावरील पत्रा गंजून गेला आहे. हा जीर्ण झालेला मनोरा उधाणात कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

समुद्राच्या उधाणामुळे आक्षी किनाऱ्यावरील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. संरक्षण बंधारा बांधण्याबाबत सरकारशी अनेकदा पत्रव्यवहार केला; मात्र अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बांधलेल्या टेहळणी मनोऱ्याची अवस्था बिकट आहे. त्यामुळे नवीन टेहळणी मनोरा बांधला पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीने आवश्‍यक सोई-सुविधा पुरवल्या जात नाहीत.
- आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षी ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com