
Mumbai : एचडीएफसी च्या पाच हजार कोटींच्या बॉण्ड साठी २८ हजार कोटी रुपये जमा
मुंबई - देशातील सर्वात मोठी गृहकर्ज पुरवठादार संस्था एचडीएफसी ने आज बाजारात आणलेल्या पाच हजार कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय कर्जरोख्यांच्या (रुपी बॉंड) इशू मध्ये थोड्याच कालावधीत गुंतवणूकदारांनी सुमारे २८ हजार कोटी रुपयांचा भरणा केला.
या बॉंड ला वार्षिक ७.९७ टक्के व्याज मिळणार आहे. या इशूसाठी एचडीएफसी ने जादा वीस हजार कोटी रुपयांचा भरणा स्वतःकडे ठेवण्याचा हक्क मिळवला होता. आज या इशूसाठी बोली लावायला सुरुवात झाल्यानंतर त्याला विमा कंपन्या, पेन्शन फंड,
प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड व बँका आदी बड्या दर्जेदार गुंतवणूकदारांनी तात्काळ मोठा प्रतिसाद दिला. पाच हजार कोटी रुपयांच्या या इशूसाठी २७ हजार ८६३ कोटी रुपयांच्या ९७ बोली लावण्यात आल्या. एचडीएफसी ने त्यातील ५५ गुंतवणूकदारांचे एकूण पंचवीस हजार कोटी रुपये स्वतः जवळ ठेवले.
या प्रक्रियेतून देशातील बड्या गुंतवणूकदारांचा एचडीएफसी वरील विश्वास दिसतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. देशात गृहनिर्माण क्षेत्राला मोठी मागणी आहे. परवडणाऱ्या घरांपासून ते उच्चभ्रूंच्या घरापर्यंत ही मागणी आहे.
मात्र अजूनही भारतात विशेषतः चांगल्या लहान घरांची संख्या कमी आहे. त्यामुळे दीर्घकालात देखील ही मागणी कायम राहणार आहे. त्याकारणाने घरांसाठी अर्थसाह्य देणाऱ्या संस्थांना गुंतवणूकदारांचा असाच पाठिंबा दिर्घकाळ मिळेल, असे एचडीएफसी चे कार्यकारी संचालक व्ही. एस. रंगन म्हणाले.