अभिनेत्यांना पाहण्यासाठी आला मुंबईत पण घडलं 'असं' काही; बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का..  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

अकील रफिक अहमद (35) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे. तो प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांचा मोठा चाहता असल्याचा दावा करत आहेत.

मुंबई: सिने अभिनेत्यांना पाहण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या तरुणावर तीन मद्यपींनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. दारू पिण्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचा दावा तक्रारदार करत आहे. दरम्यान या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पुढील तपासासाठी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार अकील रफिक अहमद (35) हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बरेलीतील ताईपुरी पोलिस चौकी परिसरात राहणारा आहे. तो प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, अक्षय कुमार या अभिनेत्यांचा मोठा चाहता असल्याचा दावा करत आहेत. 30 जून रोजी घरातल्यांना न सांगताच तो मुंबईला आला होता. त्या दिवसांपासून तो दररोज अमिताभ यांच्या बंगल्याबाहेर झोपत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

हेही वाचा: संपुर्ण मुंबईचे झाले स्क्रिनींग; मुंबई महापालिकेनं केला दावा.. 

दरम्यान 4 जुलैच्या मध्यरात्री अकील हा भारती आरोग्य निधी रुग्णालयाच्या फुटपाथवर झोपला होता. त्यावेळी त्या ठिकाणी राजेंद्र , विकास, रमेश हे तीन आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी चल असा आग्रह केला. याला अकिल याने विरोध केल्याने अकिल आणि तीन आरोपींमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावरून तीनही आरोपींनी अकीलवर चाकूने हल्ला केला. 

या हल्यात अकिलच्या पोटावर,  छातीवर आणि उजव्या हाताच्या दंडावर हल्ला केल्याने तो त्यात जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधेरी पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी त्यांनी जुहू पोलिसांकडे वर्ग केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकिल देत असलेल्या माहितीत अनेक विसंगती आढळून येत आहे. कधी अकिल हल्ला झालेले ठिकाण हे अंधेरी पूर्व असे सांगत आहे.  कधी अमिताभ बच्चन यांचा चाहता आहे असे सांगतो. तर कधी अन्य कुठल्या अभिनेत्याचा त्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळत नाही आहे.

हेही वाचा: "मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

घटनास्थळाचे सीसीटिव्ही ही तपासण्यात आले आहेत.तसेच तो दावा करत असलेल्या ठिकाणीही सीसीटीव्हीमध्ये त्याच्यावर हल्ला झाल्याचे दिसून येत नसल्याचे अधिका-याने सांगितले. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे वाटत असल्याचेही अधिका-याने सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

he came to see amitabh bacchan but this incident happen 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he came to see amitabh bacchan but this incident happen