अतिरेकी हल्ल्यांतील जखमी पोलिसाच्या कन्येला मुख्यमंत्र्यांनी दिली नोकरी

तुषार खरात
बुधवार, 28 मार्च 2018

खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना श्री जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई - मुंबईवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पोलिस काँन्स्टेबल अरूण जाधव यांची मुलगी धनश्री यांना राज्य सरकारने नोकरी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेऊन धनश्री यांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे, अशा भावना श्री जाधव यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

धनश्री यांना नोकरीत सामावून घेतल्याचा आदेश मंगळवारी जारी झाला. योगायोगाने याच दिवशी मला 29 वर्षे गुणवत्तेची पोलिस सेवा पूर्ण केल्याबद्दल `राष्ट्रपती पोलिस पदक` मिळाले. हा दुहेरी आनंद असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, अतिरेकी हल्ल्यातील कर्तृत्वाबद्दल जाधव यांना यापूर्वीच राष्ट्रपतींकडून शौर्य पदक व पराक्रम पदक मिळाले होते. आता त्यांना तिसरे पदक मिळाले आहे.

`माझ्या कन्येला नोकरी मिळावी म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. त्यांनी व्यक्तीश: लक्ष घालून माझ्या शब्दाला मान दिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्याचा मी आभारी आहे` असे श्री जाधव म्हणाले. 

धनश्री जाधव यांनी कृषी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांची कृषी खात्यात उपसंचालक या क्लास वन पदावर गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 2 एप्रिल रोजी त्या कामावर रुजू होतील, असे जाधव म्हणाले. या नियुक्तीबद्दल कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनीही जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबईतील 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळसकर हे तिघेजण अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी एका पोलीस व्हॅनमधून निघाले होते. त्यांच्यासोबत पोलीस काँन्स्टेबल अरूण जाधव हे सुद्धा होते. पण दुर्दैवाने अजमल कसाब व अबू ईस्माईल या दोन्ही अतिरेक्यांनी वाहनावर केलेल्या गोळीबारात करकरे, कामटे व साळसकर हे हुतात्मा झाले. अरूण जाधव यांनाही पाच गोळ्या लागल्या होत्या. जाधव मृत झाल्याचे समजून अतिरेक्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. ही गाडी घेऊन अतिरेकी नरिमन पाँईंटच्या दिशेने पळाले. पण मध्येच गाडी बंद पडल्याने अतिरेक्यांनी ती रस्त्यातच सोडून दिली. अतिरेकी तेथून निघून गेल्यानंतर जखमी अवस्थेत जाधव यांनी वायरलेस सेटवर माहिती दिली. अतिरेकी दुसरे एक वाहन घेऊन गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी वायरलेसद्वारे सांगितले होते. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी गिरगाव चौपाटीवर नाकेबंदी करून कसाब याला जिवंत पकडले. 

या प्रकरणी नेमलेल्या राम प्रधान समितीनेही जाधव यांचे कौतुक करून शौर्य पदक व पराक्रम पदकांसाठी शिफारस केली होती. अतिरेकी हल्ल्यात जाधव यांना 42 टक्के अपंगत्व आले आहे. 

Web Title: he Chief Minister had given a job to the daughter of the policeman