मुंबई - वांद्रे पूर्वेकडील एका शाळेतील मुख्याध्यापकाने 19 वर्षांच्या शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने या प्रकाराचे छुपे चित्रीकरण केले असून, तिच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी ज्या शाळेत शिकली, त्याच शाळेत जुलै 2017 पासून अंशकालीन शिक्षिकेचे काम करत होती. शैक्षणिक काळात सहा वर्षे या मुख्याध्यापकाने तिचा वारंवार विनयभंग केला होता. शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर तिला कामानिमित्त घरी बोलावून त्याने बलात्कार केला. बलात्काराबाबत कोणास सांगितल्यास लहान बहिणीला शाळेतून काढून टाकण्याची धमकी मुख्याध्यापकाने दिली होती, असा आरोप पीडितेने केला आहे.
लहान बहिणीचे शैक्षणिक नुकसान होईल म्हणून ही तरुणी काही दिवस शांत बसली. तिने उपमुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षकांना माहिती दिली; मात्र कुणीही विश्वास ठेवला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या तरुणीने मैत्रिणीच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्या वेळी त्यांनी छुप्या कॅमेऱ्याने चित्रण करण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर या मुख्याध्यापकाने पुन्हा घरी बोलावले असता तिने स्पाय कॅमेऱ्याने चित्रण केले; परंतु त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी तिला हे चित्रण शाळेच्या प्रशासनाकडे देण्यास सांगितले. त्याला नकार देत तिने खेरवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
|