मध्य रेल्वेच्या स्थानकांत आरोग्य तपासणी एटीएम 

मध्य रेल्वेच्या स्थानकांत आरोग्य तपासणी एटीएम 

मुंबई : मध्य रेल्वेच्या स्थानकांत "हेल्थ चेकअप एटीएम' बसवण्यात येणार आहेत. या आरोग्य तपासणी एटीएमद्वारे प्रवाशांना फक्त 60 रुपयांत 21 प्रकारच्या आरोग्य चाचण्या अवघ्या 10 मिनिटांत करता येतील. या आरोग्य तपासणीचा अहवाल तत्काळ मिळणार आहे. 

मध्य रेल्वेकडून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सोईसाठी स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आले असून, रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता स्थानकांत प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक एटीएम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे "हेल्थ चेकअप एटीएम' पहिल्यांदा नागपूर आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांत बसवण्यात येतील. 

या आरोग्य तपासणी एटीएमच्या माध्यमातून तब्बल 21 प्रकारच्या आरोग्य चाचण्या केल्या जातील. रक्तदाब, रक्तशर्करा, मूत्रपिंडाच्या कार्याची तपासणी आदी चाचण्यांसाठी प्रवाशांकडून फक्‍त 60 रुपये; तर रेल्वे कर्मचाऱ्यांकडून 20 ते 25 रुपये शुल्क घेतले जाईल. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने "हेल्थ चेकअप एटीएम' बनवणाऱ्या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीकडून वर्षाला एक लाख रुपयांचा महसूल मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

10 मिनिटांत अहवाल 

एटीएमद्वारे बोन डेन्सिटी, बॉडी मास इंडेक्‍स, रक्तदाब (ब्लड प्रेशर), मेटाबॉलिक एज, फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, शरिराचे तापमान, ऑक्‍सिजनचे प्रमाण आरोग्य चाचण्या घेतल्या जातील. त्यानंतर प्रवाशांना फक्त 10 मिनिटांत अहवाल दिला जाईल. तेवढा वेळही थांबणे शक्‍य नसल्यास प्रवाशांच्या ई-मेलद्वारे अहवाल पाठवला जाईल. प्रवाशांना आरोग्य चाचण्यांसाठी रक्त देण्याची गरज नाही, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com