आईच्या निधनानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं भावनिक ट्विट

पूजा विचारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आईच्या निधनानंतर राजेश टोपे यांनी आपल्या भावनांना ट्विटरद्वारे वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी आपल्या आईबद्दल भावनिक ट्विट केलं आहे. 

मुंबईः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदा टोपे (74) यांचे निधन झाले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून प्रदीर्घ आजाराने त्या त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षांच्या होत्या.  आईच्या निधनानंतर राजेश टोपे यांनी आपल्या भावनांना ट्विटरद्वारे वाट मोकळी करुन दिली आहे. त्यांनी आपल्या आईबद्दल भावनिक ट्विट केलं आहे. 

ती अजातशत्रु होती.एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही.सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती.दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील. असं भावनिक ट्विट टोपे यांनी केलं आहे.

शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी 4 वाजता पाथरवाला ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणारेत.  कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचाः  कोरोनाच्या संकटकाळात मुंबई पालिकेवरील भार वाढला, तब्बल इतके कोटी खर्च

राजेश टोपे यांच्या आईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मार्चमध्येही त्या महिनाभर ॲडमिट होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

अधिक वाचाः  बहिणींनो काळजी करू नका; रक्षाबंधनसाठी रविवारीही पोस्टाची सेवा सुरू

कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.

Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died emtional tweet


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Rajesh Tope Mother Sharda Tope Died emtional tweet