राज्यभर ‘आपला दवाखाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health update 700 Balasaheb Thackeray Aapla Davakhana state CM Eknath Shinde mumbai

राज्यभर ‘आपला दवाखाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी राज्यशासन आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार आहे. त्याचबरोबर राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्याबरोबरच बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

“सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात असून राज्यात सुमारे ७०० ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. तर मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी ५० दवाखाने दोन ऑक्टोबरपासून सुरू झाले असून आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना घराजवळ आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्पष्ट केले.

आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन

“प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल.

सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही, त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात असून ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे, तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री