दहा लाखांत हृदय प्रत्यारोपण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

मुंबई - हृदय प्रत्यारोपणावर होणारा 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतचा खर्च दहा लाखांपर्यंत खाली येणार आहे. पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणासाठी नवा विभाग वर्षभरात सुरू होणार आहे. यासाठी एका डॉक्‍टरला प्रशिक्षणासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले आहे. देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण "केईएम'मध्येच करण्यात आले होते. मुंबईतील एकाही सार्वजनिक रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण होत नसल्यामुळे गरजूंना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. या रुग्णालयांमध्ये संपूर्ण उपचारासाठी 25 ते 30 लाखांपर्यंतचा खर्च येतो. केईएम रुग्णालयात सध्या यकृत आणि मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. के. सेन यांनी 50 वर्षांपूर्वी या रुग्णालयात देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले होते. येथे 60 च्या दशकात दोन हृदय प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यानंतर अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालीच नाही. मध्यमवर्गीय रुग्णांची ही परवड लक्षात घेत आता "केईएम'मध्ये ही सेवा सुरू केली जात आहे.

हृदय प्रत्यारोपणासाठीचा विशेष विभाग सुरू करण्यासाठी आवश्‍यक परवानगी दीड वर्षांपूर्वीच मिळाली होती. हा विभाग सुरू करण्यासाठी एक कोटीपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी दहा लाखांपर्यंत खर्च येईल, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Web Title: heart transplant in 10 lakh rupees KEM Hospital