मुंबई-ठाण्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

पूजा विचारे | Wednesday, 15 July 2020

येत्या ४८ तासांत  मुंबई, ठाण्यासह उपनगर आणि कोकणात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. मुंबईकरांनी मंगळवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अनुभव घेतला.

मुंबई- येत्या ४८ तासांत  मुंबई, ठाण्यासह उपनगर आणि कोकणात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय. पावसाला पोषक परिस्थिती तयार झाल्याने मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईकरांनी मंगळवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अनुभव घेतला.

मुंबईत कुलाबा, नरिमन पॉइंट, मस्जीद बंदर, सांताक्रूझ परिसरात पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. ठाण्यासह उपनगरांमध्येही पाऊस सुरु आहे. पावसामुळे मुंबईत पाणी साचण्याच्या घटनांचे पूर्वानुमान देणाऱ्या ‘आयफ्लोज मुंबई’ नव्या प्रणालीनुसार भायखळा, आग्रीपाडा, दक्षिण मुंबई, देवनार, अंधेरी (प.), विलेपार्ले (प.) या प्रभागातील सखल भागात काही ठिकाणी दोन फूट पाणी साचू शकते. तर चेंबूर, वरळी, लोअर परळ, भांडूप (प.) आणि दहिसर प्रभागातील काही ठिकाणी एक फूट पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या यंत्रणेनं दिलेल्या अलर्टनुसार मुंबईतल्या ६१ प्रभागांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचण्याची शक्यता असून २९ प्रभागांमधअये तीन फुटांहून अधिक पाणी साचण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबई आणि परिसरात मंगळवारी अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. सीबीडी बेलापूर येथे १०५ मिमी, कांदिवली, मालवणी आणि वाशी गाव येथे ४० ते ५० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. मंगळवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये कांदिवली पश्चिम अग्निशमन दल केंद्र येथे मुंबईतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कांदिवली येथे ४५.४५ मिलीमीटर पाऊस पडला. दक्षिण मुंबईत केवळ एक ते पाच मिमी पावसाची नोंद झाली, तर पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरे आणि ठाणे येथे काही ठिकाणी १५ ते ३० मिमी पाऊस झाला. 

सांताक्रूझ येथे मंगळवारी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या वेळेत ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर कुलाबा येथे २२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभराच्या पावसानंतर मुंबईतील कमाल तापमानात मंगळवारी थोडी घट झाली. सांताक्रूझ येथे २८.९, तर कुलाबा येथे २८ अंश सेल्सिअस तापमान होते.

शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. तर पुन्हा शनिवारी पावसाचा जोर थोडा वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अद्ययावत माहिती हवामान विभागाकडून जारी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान आजसाठी मुंबईकरांना सज्ज राहण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. 

heavy rain continues mumbai today imd issues orange alert