मुंबईत दाणादाण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबईला गुरुवारी झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले होते. रुळांवर पाणी तुंबल्याने लोकल सेवाही विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. ट्रॉम्बे येथील चित्ताकॅम्प येथे नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून आदिहान तांबोळी या अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

मुंबई - मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबईला गुरुवारी झोडपून काढले. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते जलमय झाले होते. रुळांवर पाणी तुंबल्याने लोकल सेवाही विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. ट्रॉम्बे येथील चित्ताकॅम्प येथे नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून आदिहान तांबोळी या अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी 10 नंतर पावसाने काही भागांत जोर धरला. परळ येथे सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत 48 मिलिमीटर पाऊस पडला. या दोन तासांत हिंदमाता परिसरात कंबरभर पाणी तुंबले. किंग्जसर्कल, शीव येथेही पाणी तुंबल्याने उपनगरातून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक कोलमडली. कुर्ला-शीवदरम्यान आणि मानखुर्द येथे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवेचा बोजवारा उडाला. सायंकाळपर्यंत मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. मॉन्सूनपूर्व पावसाने आतापर्यंत मुंबईत सहा बळी घेतले. ट्रॉम्बे येथे रस्त्यालगतच्या उघड्या चेंबरमधून नाल्यात पडून गुरुवारी आदिहान याचा मृत्यू झाला. या गटाराच्या चेंबरवर फायबरचे झाकण होते. पावसाच्या पाण्यामुळे ते वाहून गेल्याने आदिहान त्यात पडला, अशी माहिती स्थानिकांनी दिली; मात्र याबाबत महापालिका प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले. गतवर्षी प्रसिद्ध पोटविकारतज्ज्ञ दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यानंतरही पालिकेला जाग आलेली दिसत नाही. शुक्रवारी भांडुप येथे विजेच्या झटक्‍याने तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात दोघांचा बळी गेला. 

शनिवार, रविवारी अतिवृष्टी 
मुंबईत 8 ते 12 जून या कालावधीत अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला होता. मात्र, शनिवार (ता. 8) आणि रविवारी (ता. 9) अतिवृष्टी होईल, असा नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यातील काही भागांत गुरुवारी मॉन्सूनचे आगमन झाले. तो महाराष्ट्रात उद्या पोहचेल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली.

Web Title: heavy rain in mumbai