मुंबई बुडवून दाखवली! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई - मुसळधार पावसाने सोमवारी रात्रीपासून जोर धरल्याने मंगळवारी (ता. ३) मुंबईकरांची दाणादाण उडाली. मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मुंबई महापालिका आणि इतर सरकारी यंत्रणांचे सर्व दावे फोल ठरले. ‘मुंबई बुडवून दाखवली’ अशी संतप्त प्रतिक्रिया पावसात खोळंबलेल्या नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

अंधेरीत पूल पडल्याने पश्‍चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्णतः कोलमडली होती. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरही प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. नोकरदारांना ऑफिस गाठण्यास उशीर झाला. 

काही मिनिटांच्या प्रवासाला तासाभराहून अधिक वेळ लागत होता. पूर्व उपनगरांची पावसाने पार दैना केली होती. किंग्ज सर्कल आणि हिंदमाता परिसरात नेहमीप्रमाणे पाणी तुंबले. शीव रुग्णालयापासून किंग्ज सर्कलचा अवघा एका किमी मार्ग ओलांडण्यासाठी तब्बल २० मिनिटे लागत होती. शीव स्थानकात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेही काही काळ ठप्प होती. पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली; मात्र सायंकाळी १५ ते २० मिनिटे गाड्या उशिराने धावत होत्या. पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ‘महापालिकेने मुंबई बुडवून दाखवली’ अशी प्रतिक्रिया संतापलेल्या नागरिकांनी दिली. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आणि पंपिंग स्टेशन आदी यंत्रणा फोल झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोपही होत आहे. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्‍वास घेतला. मात्र, पावसाची दहशत मुंबईच्या मनात कायम राहिली आहे.

Web Title: heavy rain in mumbai