रेन ब्लॉक!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

चौथ्या दिवशीही मुंबई परिसराला पावसाने झोडपले

चौथ्या दिवशीही मुंबई परिसराला पावसाने झोडपले
मुंबई - शनिवारपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारीही मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला झोडपले. मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या रस्त्यांमुळे जागोजागी झालेली वाहतूक कोंडी, रुळांवरही पाणी साचल्याने खोळंबलेली लोकल वाहतूक यामुळे जनजीवन विस्कळित झाले. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक होता. मुंबई परिसरात बुधवारीही जोरदार सरी कोसळतील, काही भागांत अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, शीव, वडाळ्यासह अनेक भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी तर कंबरेपर्यंत पाणी साचल्याने नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला. पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवाही कोलमडली. पश्‍चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकात पाणी साचल्याने बोरिवली ते विरारपर्यंतही वाहतूक ठप्प पडली होती. मध्य तसेच हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबईतून सुटणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसनाही पावसाचा फटका बसला. अनेक विमानांच्या वेळापत्रकावरही पावसाचा परिणाम झाला. पावसाचा जोर वाढल्याने दुपारच्या सत्रात अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. मुंबईच्या शहर विभागात दुपारपर्यंत 71 मिमी., पूर्व उपनगरांत 49 मिमी तर पश्‍चिम उपनगरांत 41 मि.मी. पावसाची नोंद झाली.

वसईत कहर
पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्‍यात पावसाने कहर केला आहे. वसईतील भोईदापाडा, वागराळपाडा परिसरात पाणी साचल्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफ, पोलिस आदींनी मोहीम राबविली. पश्‍चिम रेल्वेवरील वसई-नालासोपारा स्थानकांदरम्यान अडकलेल्या बडोदे एक्‍स्प्रेसमधील 400 प्रवाशांची एनडीआरएफच्या पथकाने तब्बल पाच तासांनंतर सुटका केली.

पालघर
- जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळित. रेल्वे, रस्ते वाहतुकीचा बोजवारा. बहुतेक शाळांना सुटी. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.

ठाणे
- कळवा रेल्वे स्थानकात जवळच्या नाल्याच्या पुराचे पाणी शिरल्याने रूळ पाण्याखाली.
- जिल्ह्यातील अनेक शाळांना दुपारच्या सत्रात सुटी
- कल्याणमध्ये अनेक भागांतील घरांमध्ये पावसाचे पाणी
- ठाणे-भिवंडी बायपासवरील साकेत पुलावर तडे
- अंबरनाथमधील चिखलोली धरण ओव्हरफ्लो

रायगड
- खोपोलीतील पाताळगंगा नदीला पूर
- कर्जत तालुक्‍यातील मोग्रज येथील शेतकरी धामणी नदीत वाहून गेला.

Web Title: heavy rain in mumbai