पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस ; वसई, विरार, नालासोपारा जलमय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

विरार पश्‍चिम रेल्वे ब्रिज ते विवा कॉलेज रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. नालासोपारा पूर्वेकडील अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावरील घरात गुडघाभर पाणी साचले. ही दरवर्षीची परिस्थिती असताना याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. 

नालासोपारा/ बोईसर/ बोर्डी : मागील जवळपास आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्री पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली. वसई, विरार, नालासोपारामध्ये सलग पाच ते सात तास पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली. 

वसई, विरारमध्ये पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली. विरार, नालासोपारा आणि वसईला जोडणारा सेंट्रल पार्कचा मुख्य रस्ता जलमय झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी, टाकीपाडा, तुळिंज, रेल्वे ब्रिज तसेच वसईतील आनंद नगर, समता नगर, पूर्वेकडील नवजीवन, सातिवली, धानिव या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक ठिकाणी पाण्यातून मार्ग काढताना वाहने मधेच बंद पडत होती. सकाळच्या वेळी स्कूल व्हॅन बंद पडल्याने शाळकरी मुलांचेही हाल झाले.

विरार पश्‍चिम रेल्वे ब्रिज ते विवा कॉलेज रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. नालासोपारा पूर्वेकडील अनेक सोसायट्यांच्या तळमजल्यावरील घरात गुडघाभर पाणी साचले. ही दरवर्षीची परिस्थिती असताना याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली. 

बोईसरमध्ये पुरसदृश स्थिती 

बोईसरमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अमेय पार्क, शिवाजीनगर, लोखंडीपाडा येथे पुरसदृश स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले. महामार्गाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बेटेगाव येथे पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

अनेक वाहने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने पाण्यात अडकून पडली. लोखंडीपाडा येथे बोईसर शहराकडे जाणारा एकमेव पूल पाण्याखाली गेल्याने या पाड्याचा बोईसरशी संपर्क तुटला. दुसरीकडे पालघरच्या पूर्व, पश्‍चिम भागात सकाळी 6 वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसाच्या पुनरागमनामुळे बळिराजा सुखावला आहे. 

Web Title: Heavy rain in Palghar district