विक्रमगड तालुक्‍यात पुन्हा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

वाचलेले भातपीकही हातचे जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना धडकी

विक्रमगड : विक्रमगड तालुक्‍याला विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पावसाने पुन्हा झोडपल्याने दिवाळीनंतर राहिलेले आणि पावसापासून वाचलेले भातपीक कापण्याच्या मागे लागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. या पावसाने राहिलेले भातपीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

दिवाळीच्या आधी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच पावसामुळे कापणी न केलेले पीक दिवाळीत शेतातच राहिले होते. त्यानंतर वातावरण चांगले झाले; मात्र दिवाळी सण आल्याने भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कापणीची कामेही थांबली होती.

भातपीक कापण्याच्या हंगामातून जाऊ लागल्याने दिवाळी संपताच मागील २ दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापणीला सुरवात केली. मात्र शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भातपीक भिजले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 

शेतकरी द्विधा मनस्थितीत
पावसाच्या भीतीने भातपिकाची कापणी केली नाही, तर ते कापण्याच्या हंगामातून जाईल आणि हाती काही लागणार नाही. कापले तर अवकाळी पावसाने त्याचे नुकसान होऊन भाताच्या दाण्याला मोड येऊन कुजून ते खराब होऊन जाईल, अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी अडकला असून करावे तरी काय, असा प्रश्न संकटग्रस्त शेतकऱ्याला पडला आहे.

दिवाळी संपल्याने दोन दिवस मजूर घेऊन आम्ही कापणीला सुरवात केली आहे. भाताचे कणीस सुकायला ३ ते ४ दिवस लागतात. त्यानंतर त्याची बांधणी केली जाते; मात्र दोन दिवस मोठ्या प्रमाणात कापणी केल्यानंतर पुन्हा झालेल्या पावसाने कापलेले पूर्ण भातपीक भिजवले आहे. कापणी केली तर पाऊस पीक वाया घालवतो आणि कापणी नाही केली, तर भातपीक जास्त पिकून वाया जाईल, ही भीती असल्याने नक्की काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
- बबन सांबरे
, शेतकरी

विक्रमगड : पावसामुळे भातपिकाचे झालेले नुकसान. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Vikramgad