MumbaiRains : पावसामुळे रेल्वे वाहतूक उशीराने; साचले पाणी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

गोरेगाव, मालाड, मढ, मार्वे, मनोरीसह कांदिवली, बोरीवली या भागात पावसाच्या दमदार हजेरीमुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई, मालाड सबवेत पावसाचे पाणी साचल्याने सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. तर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वे रूळावर पाणी साचल्यामुळे अंबरनाथ, बदलापुर लोकल एका पाठोपाठ उभ्या आहेत. 

बदलापूरहून निघालेली सीएसएमटी 7.36 जलद ट्रेन विठ्ठलवाडी स्थानकात थांबवण्यात आली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत गाडी पुढे धावणार नाही अशा अनाऊन्समेन्ट रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे उपनगरी गाड्या सावध गतीने धावत आहेत असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

गोरेगाव, मालाड, मढ, मार्वे, मनोरीसह कांदिवली, बोरीवली या भागात पावसाच्या दमदार हजेरीमुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. मुंबई, मालाड सबवेत पावसाचे पाणी साचल्याने सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये आज पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सलग तीन तास कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमधील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्वेतील श्रीकृष्णनगर, कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा एकदा सखल भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून पडणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता जिल्हाधिकारी ठाणे यांनी सर्व शाळा कॉलेजला सुट्टी दिली आहे त्याचप्रमाणे नागरिकांनीसुद्धा शक्यतो घराबाहेर पडू नये आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in Mumbai affect on local railway