गाळ काढण्यासाठी नवे धोरण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall new strategy to remove the sludge in river Chief Minister Eknath Shinde mumbai

गाळ काढण्यासाठी नवे धोरण करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूण येथील वशिष्ठी नदीतील गाळ काढण्याची मोहीम सुरू आहे. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात सर्वंकष धोरण आखण्यात येत आहे. यासंदर्भातील कारवाई युद्ध पातळीवर करू, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात सदस्य सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण, भास्कर जाधव, नितेश राणे, भरत गोगावले यांनी सहभाग घेतला होता.

या वर्षी नदीतून गाळ काढण्याचे काम झाल्याने गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरले नाही. भविष्यात पूरपरिस्थिती राज्यात कुठेही निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. जून महिन्यात वाशिष्ठी व शिवनदीतून एकूण ८.१० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला कचरा व ढिगारे उचलणे, मदत छावण्या, शेतीपिके व मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दराने ५१ कोटी ८० लाख इतका निधी गाळ काढण्यासाठी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी १० कोटी २८ लाख ५६ हजार निधी प्राप्त झाला आहे. ५५ टक्के निधी खर्च करून नदीतील गाळ काढण्यात आला आहे. प्रस्ताव येतील तसा निधी प्राप्त करून देण्यात येईल. तसेच गाळ काढण्यासाठी टप्पा दोन व तीन लवकरच सुरू करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आदेश कधी काढणार ?

राज्यातील नद्यांच्या खोलीकरण, गाळ काढणे आणि रुंदीकरणासाठी सरकारने तत्काळ आदेश काढला पाहिजे, याशिवाय यंत्रणा काम सुरू करणार नाही असा मुद्दा अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की मागील अडीच वर्षांत अनेकदा चर्चा झाली. पण ठोस असे काही झाले नाही. नद्यांतील गाळ काढण्याबाबत सर्वंकष धोरण जाहीर करू. यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत आपण हे काम पूर्ण करू.

Web Title: Heavy Rainfall New Strategy To Remove The Sludge In River Chief Minister Eknath Shinde Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..