दक्षिण मुंबईतील सखल भाग जलमय, मुसळधार पावसाचा लोकांना मनस्ताप

दिनेश चिलप मराठे | Wednesday, 23 September 2020

दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी शिरले आहे. बी वार्ड ऑफिसर कॉर्टर्स येथे पाणी भरले आहे. जेजे रुग्णालय परिसर, भेंडी बाजार, नळ बाजार,अलंकार सिनेमा ग्रांट रोड, मुख्यचौक येथे गुडघाभर पाणी साचून इमारतीत, दुकानात पाणी शिरलं आहे.

मुंबईः  मंगळवारी संध्याकाळपासून मुंबईत धोधो पाऊस कोसळतोय.  त्यामुळे दक्षिण मुंबईतील सखल भागात पाणी शिरले आहे. बी वार्ड ऑफिसर कॉर्टर्स येथे पाणी भरले आहे. जेजे रुग्णालय परिसर, भेंडी बाजार, नळ बाजार,अलंकार सिनेमा ग्रांट रोड, मुख्यचौक येथे गुडघाभर पाणी साचून इमारतीत, दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे नुकसान झाले. मशिद बंदर येथील चटई चाळ, अहमदाबाद बाद स्ट्रीट परिसर येथे पाणी साचले. जवळपास 35 - 40 बैठ्या घरांची वस्ती असलेल्या परिसरात सकाळी सहा वाजता घरात पाणी शिरल्यानं मोठा गोंधळ उडाला. लोकांना आपापल्या घरातील सामान आवरून सुरक्षित जागी ठेवावे लागले असे गृहिणी सुनीता राजेश रोटकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

वरळी बीडीडी चाळ, दक्षिण मुंबईतील विविध भागात मुसळधार पावसामुळे पाणी तुंबल्याने परिसर जलमय झाला. भेंडी बाजार, नळबाजार, गिरगावातील काही भाग कुंभारवाडा, खेतवाडीतील काही सखल भागातही त्याचप्रमाणे वरळी बीडीडी चाळ येथे पाणी साचलं आहे. तेथील बैठ्या घरांमध्ये पाणी साचल्यानं घरातील साहित्य पाण्याखाली आलं. काही दुचाकी वाहने साचलेल्या पाण्यात बंद पडल्यानं त्यांना धक्का मारून रस्त्याच्या कडेला आणताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली तर चार चाकी वाहन चालकांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.

हेही वाचाः  मुंबईतल्या पावसाचा फटका वाहतुकीवर, रेल्वे सेवा विस्कळीत

Advertising
Advertising

नायर रुग्णालयातील ओपीडीमध्ये पाणी शिरल्यामुळे वैद्यकीय साहित्य पाण्याखाली आलं. त्यामुळे मोठे नुकसान झालं असल्याचं केशव मुळे यांनी सांगितले. 

वरळी येथे जोरदार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेलेत. त्यामुळे या भागातील आमदार आदित्य ठाकरे यांनी करुन दाखवले असे म्हणत बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीचे मुंबई अध्यक्ष सागर जगताप यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आधी पालिकेच्या कामात सुधारणा करा मग मुंबईची तुंबई होणार नाही असा खोचक सल्लाही जगताप यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Heavy Rainfall South Mumbai Rain Updates