बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानक जलमय, ठाण्यातही अतिवष्टी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

ठाण्यातील घोडबंदर परिसरात साचलेल्या पाण्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला होता.

ठाणेः दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने शुक्रवारी शहरासह जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे "26 जुलै'च्या धडकीने ठाणेकर भयभीत झाले होते. जोरदार सरींमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ठाण्यातील घोडबंदर परिसरात साचलेल्या पाण्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे घराकडे निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. जिल्ह्यात दिवसभरात 100 मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली.

ठाणे शहरात दिवसभरात 90 मि.मी. पावसाची नोंद झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे झाडे तर नौपाडा परिसरात विजेचा खांब कोसळला. गडकरी रंगायतन परिसरातील आम्रपाली हॉटेलचा परिसर आणि गौतम दीप सोसायटी घंटाळी येथे पाणी साचले होते. शहरातील घोडबंदर रोडवर रात्रीच्या जोरदार सरींमुळे पाणी साचून वाहतूक कोंडी झाली होती. अनेक लोकल धीम्या गतीने सुरू होत्या. बदलापूर रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचल्याने बदलापूरच्या दिशने जाणारी वाहतूक रात्री 10 नंतर कल्याण स्थानकात रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. अनेक प्रवासी कल्याण स्थानकात ताटकळले होते.

सतर्कतेचा इशारा
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दुपारी हिरावती इंद्रजीत पाल यांच्या घरावर जुने झाड कोसळले. कैलास नगर परिसरातील ढगाले चाळीत ही दुर्घटना घडली. राम मारुती रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोरील सायकल थांब्यालगतचा विजेचा खांब कोसळला. दरम्यान, शहरात पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rainfall in thane, badlapur, ambarnath cities