#MumbaiRains मुसळधार पावसामुळे मुंबईत साचले पाणी, रेल्वेसेवा विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या सर्वच भागात पाणी साचले असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही होताना दिसत आहे. अंधेरी, वांद्रे, सायन, हिंदमाता, दादरसह अनेक भागात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. फुटपाथ व रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.

मुंबई : मुंबईत कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व रेल्वे लाईन्सवर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत. पश्चिम, मध्य व हार्बर लाईन्सवरील लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. सायन, वांद्रे स्टेशनात पाणी शिरल्याने काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या आहेत. सकाळी साडेआठ वाजता मुंबईत 231.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार व संततधार पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने कामावर जायला उशीर होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या सर्वच भागात पाणी साचले असल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवरही होताना दिसत आहे. अंधेरी, वांद्रे, सायन, हिंदमाता, दादरसह अनेक भागात वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. फुटपाथ व रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.

पावसामुळे पाणी साठल्याने मुंबई-पुणे महामार्गावर कळंबोली येथे मुंबईकडे येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून, वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. तसेच नवी मुंबईमधील सानपाड येथे सायन-पनवेल महामार्गावर पावसामुळे तळे निर्माण झाले आहे. काही वाहने रस्त्यावरच अडकून पडली आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी झाली आहे. 

Web Title: heavy rains in mumbai impact on railways and local service