दप्तराचे ओझे अजूनही जडच!

दप्तराचे ओझे अजूनही जडच!

मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले, तरी प्रत्यक्षात मात्र अनेक शाळांत विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावेच लागत असल्याचे चित्र ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

काही शाळांनी सरकारी निर्देशांचे पालन केले असले, तरी अजूनही काही शाळांमध्ये मुलांचे आरोग्य, त्यांची वजन वाहून नेण्याची क्षमता याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले. काही शाळांमध्ये (त्यांची नावे जाणीवपूर्वक गोपनीय ठेवण्यात आली आहेत) तर सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर तब्बल आठ-साडेआठ किलो वजनाचे दप्तर आढळून आले.

मणक्याचे आजार
लहान वयात जड दप्तरे वाहून नेणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतरच्या काळात पाठीच्या मणक्‍याचे आजार जडतात हे वैद्यकीय अहवालातून समोर आले असतानाही विद्यार्थ्यांना हे ओझे वाहावे लागतच आहे.

ठाण्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा काहीअंशी या निर्देशांचे पालन करताना दिसून आल्या. मराठी शाळांनी मात्र हे वजनाचे निर्बंध पायदळी तुडवल्याचे दिसून आले. इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनात २ ते ३ किलोची तफावत दिसून आली. या विषयावर ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी मंगळवारी व बुधवारी काही शाळांतील मुले, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी संपर्क साधला. मुलांच्या दप्तराचे वजन करून त्याच्या नोंदी घेतल्या.

वजनाचे निर्बंध पायदळी!
मानव संसाधन विकास मंत्रालयाने गतवर्षी सर्व राज्यांसाठी यासंदर्भातील नियमावली जाहीर केली होती. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर जास्तीत जास्त दीड किलोपर्यंत आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे दप्तर कमाल पाच किलोपर्यंत अशी मर्यादा त्यात घालून देण्यात आली होती. त्यानुसार काही शाळांनी त्यांच्या तासिका तसेच पाठ्यक्रमात बदल केले असले, तरी एकंदर दप्तराची जाडी आणि वजन काही कमी झाल्याचे दिसत नाही. 

जीवनशैलीतील फरक लक्षात घ्या...
पूर्वीच्या विद्यार्थ्यांची आणि आताच्या विद्यार्थ्यांची जीवनशैली भिन्न आहे. लहान वयातच हल्ली मुलांना अनेक त्रास होतात याची दखल घेतली गेली पाहिजे, असे मत बहुतांश पालकांनी व्यक्त केले. 
विद्यार्थ्यांनीही, आम्हाला दप्तराच्या ओझ्याचा त्रास होतो अशी तक्रार ‘सकाळ’कडे व्यक्त केली. पूर्वी शाळांना मैदाने होती. मैदानी खेळांमुळे मुले तंदुरुस्त राहत. आता त्यांची जीवनशैली बदललेली आहे. त्यांना थोडेसे धावायला सांगितले तरी अनेकदा धाप लागते. शाळांमध्ये रोज विविध विषयांचे तास असतात. या तासांची वह्या-पुस्तके मुलांना शाळेत घेऊन जावे लागते. काही मुले शाळेतूनच शिकवणीला जातात. त्याच्या वह्याही त्यांच्या दप्तरात असतात. शाळा आणि मुलांच्या आई-वडिलांनीही याची दखल घ्यायला हवी. विविध पालकांकडून अशी मते पाहणीदरम्यान समोर आली.

पाठीवरचे थोडे ओझे हातात
शालेय दप्तरात वह्या-पुस्तके व सोबत जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली असते. हे ओझे हलके करण्यासाठी मुलांना डबा आणि पाण्याची बाटली बास्केटमध्ये घेऊन येण्याचा आदेश काही शाळांनी दिला आहे. यामुळे पाठीवरचे थोडे ओझे हातात आले आहे.

    इयत्ता         वजन मर्यादा         

     १, २                 १.५
    ३, ४, ५             २ ते ३
    ६, ७                   ४
    ८, ९                  ४.५
    १०                    ५ (किलोमध्ये)


‘सकाळ’च्या पाहणीचे निष्कर्ष
इयत्ता      दप्तराचे ओझे (किलो)
३                 ४ ते ५
४                ५ ते ६
५                ७ ते ७.५
६                 ६ ते ७
७                    ८
८                ७ ते ८.५

लहान मुलांसाठी मूल्याधिष्ठित पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजेत. वजनाने हलका असलेला कागद पाठ्यपुस्तके आणि वह्या यासाठी वापरल्या पाहिजेत. परदेशात अशी पाठ्यपुस्तके उपलब्ध असतात. पहिली ते चौथीसाठी पाटी आणि पेन्सिल वापरता येईल. प्रत्येक स्तरासाठी भाग एक-सत्र एक आणि भाग दोन-सत्र दोन अशी पाठ्यपुस्तके तयार करावीत. घरची वह्या आणि पुस्तके घरी आणि शाळेची पुस्तके शाळेत अशी दोन दप्तरांची योजना करता येईल. 
 - प्रा. अरुण ब. मैड, अंबरनाथ

मुलांच्या वजनाच्या मानाने त्यांच्या दप्तराचे वजन खूपच दिसते. मुलांचा हा त्रास कमी होण्यासाठी आम्ही स्वतःच शाळेत विद्यार्थ्यांचा वेगळा अभ्यासक्रम बनवला आहे. तो ‘युनिट टेस्ट’निहाय आहे. दिवसाला केवळ दोन ते तीन विषयांची वह्या व पुस्तके आणावयास सांगतो. यामुळे निश्‍चितच त्यांच्या पाठीवरील ओझे काही प्रमाणात कमी झाले आहे.
- ज्योती परब, मुख्याध्यापिका, संकल्प इंग्लिश स्कूल, ठाणे

मुलांच्या आरोग्याचा विचार करता एवढे वजन कसे पेलवणार याची भीती कायम मनात असते. त्यामुळे शाळेपर्यंत मीच त्याचे दप्तर घेऊन जाते. मोठ्या माणसांनाच या वजनाने खांदेदुखीचा त्रास जाणवतो; तर मुलांचे काय होत असेल? 
- रसिका जोशी, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com