हेलिकॉप्टरच्या उड्डाणात इमारतींचा अडथळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

एक हजार फुटांपर्यंत हेलिकॉप्टर उडत असेल, तर तांत्रिक बिघाडाच्या वेळी त्याला निर्णय घेण्यास पुरेसा वेळ मिळतो. जमिनीपासूनचे अंतर जितके कमी, तेवढा अपघात जास्त नुकसान करतो. मुंबईतील अनेक इमारतींची उंची 500 फुटांहून अधिक आहे. यामुळे उड्डाणात अडथळा येतो. एक हजार फुटापर्यंत उंची वाढवली पाहिजे.
- विंग कमांडर रमेश मलिक, सचिव रोटरी विंग सोसायटी ऑफ हेलिकॉप्टर

पाचशे फुटांची उंची वाढवण्याची शिफारस
मुंबई - शहर व उपनगरांत उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारतींच्या सभोवताली भिरभिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणावर बंधने आली आहेत. जमिनीपासून अवघ्या 500 फुटांपर्यंत हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी असल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याची भीती हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

रविवारी जुहू विमानतळावरून मुंबई दर्शनाकरता उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच आरे कॉलनीत हेलिकॉप्टर कोसळले. काही वर्षांतील मुंबईच्या हवाई हद्दीतील अशी ही पहिलीच दुर्घटना आहे. सोमवारी "एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो'च्या पथकाने अपघाताच्या ठिकाणाला भेट देऊन तपास सुरू केला. केंद्रीय नागरी उड्डाण संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तपास अहवाल हाती आल्यावरच याबाबत बोलता येईल, असे सांगण्यात आले.

हेलिकॉप्टरचे मार्ग निश्‍चित असून, मार्च 2010 मध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तबही केले होते. 2015मध्ये केंद्रीय नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाने सर्वेक्षण करत हेलिकॉप्टरचे नवे मार्ग निश्‍चित केले. शहरात इमारतींच्या वाढत्या उंचीच्या अडथळ्यामुळे हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची मर्यादा एक हजार फुटांपर्यंत असावी, अशी शिफारस महासंचालनालयाने केली होती. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेची ही नियमावली असली तरी ही शिफारस अद्याप कागदावरच आहे.

ही शिफारस लवकर मान्य होईल, असे वाटत नाही. कारण विमानतळापासून प्रवासी विमानाकरता 1700 फुटांचे अंतर आहे. हेलिकॉप्टरची मर्यादा एक हजार फूट झाल्यास विमानांची मर्यादाही दोन हजार 200 फुटांपर्यंत वाढवावी लागेल. त्यात तांत्रिक अडचणी असल्याने कंपन्या राजी होणार नाहीत.
- विपुल सक्‍सेना, हवाई तज्ज्ञ

Web Title: The helicopter's flight block buildings

टॅग्स