इस्रायलच्या मदतीने मोदी सरकारकडून हेरगिरी

File Photo
File Photo

ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात आहे. हे पाळत ठेवण्याचे काम इस्रायलच्या एनएसओ समूहाने भारत सरकारच्या परवानगीनेच सुरू केल्याचा आरोप करत ही हेरगिरी आम्ही खपवून घेणार नाही, त्याविरोधात लढा उभारू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

संविधानाने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट करण्याचा डाव या पाताळयंत्री हुकुमशाहीने रचला असल्याचे आव्हाड म्हणाले. याबाबत आमदार आव्हाड यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सामान्य माणसे, कार्यकर्ते यांच्यावरील ही हेरगिरी आपण सहन करणार नसल्याचेही त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. इस्रायल आणि मोदी यांचे सबंध किती घनिष्ट आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण भारतीय संविधानाने दिलेले अलिखित स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे काम सरकारचे आहे अन्‌ आता त्याच स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. 

या मार्गाने मोबाईल बेडरूममध्ये ठेवून तुम्हाला कपडे बदलणेही शक्‍य होणार नाही. भारतीय लोक आपल्या शयनकक्षामध्ये काय करताहेत, यावरदेखील इस्रायलच्या एनएसओ समूहाचे लक्ष असेल; ही हेरगिरी सरकारच्या मर्जीनेच सरू झाली आहे. त्यामुळे मोबाईलधारकाला काहीही खासगी आयुष्य शिल्लक राहणार नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

"पेगासस'द्वारे अशी होते हेरगिरी 
नागरिकांच्या फोनमधले व्हॉट्‌सऍप संदेश मे 2019 पर्यंत, त्यांच्या नकळत वाचले जात होते, असा खळबळजनक दावा, व्हॉट्‌सऍपने इस्रायलच्या एनएसओ समूहावर कॅलिफोर्नियात दाखल केलेल्या खटल्यामध्ये करण्यात आला आहे. "एनएसओ' ही कंपनी "पेगासस' नावाचे एक सॉफ्टवेअर बनवते आणि मोबाईलधारकाच्या स्मार्टफोनमध्ये चलाखीने पेरते. 'एक्‍सप्लॉईट लिंक' या नावाचा पर्याय जर तुम्ही कळतनकळत क्‍लिक केलात, तर पेगासस तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर व्हॉट्‌सऍपने कितीही सुरक्षिततेचे उपाय योजले, तरी तुमचे मेसेज पेगासस वाचू शकतो, हे या खटल्यामुळे उघडकीस आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com