मदतीअभावी पोलिस ‘आधार’विना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याबाबत मदत करण्यासाठी आधार कार्ड प्राधिकरणाचा नकार मिळाल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे...

मुंबई - बेवारस मृतदेहांची ओळख पटवणे पोलिसांसाठी दिव्यच असते. त्यासाठी पोलिसांनी ‘आधार कार्ड’ प्राधिकरणाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्राधिकरणाच्या नकारघंटेमुळे तो असफल ठरला. परिणामी बेवारस मृतदेहाची ओळख पटवण्याचा पोलिसांचा एक मार्ग बंद झाला.

गतवर्षी अरबी समुद्रात सापडलेला महिलेचा मृतदेह आणि कुरारमध्ये झालेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्राधिकरणाची मदत मागितली होती; परंतु त्यांनी मदत करण्यास नकार दिला आहे.  

तीन महिन्यांपूर्वी नौदलाच्या आयएनएस अश्‍विनी रुग्णालयापासून काही अंतरावर सागरी पोलिसांना गस्तीदरम्यान महिलेचा मृतदेह सापडला. त्या महिलेचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेला होता. कफ परेड पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह विच्छेदनासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात पाठवला. त्या महिलेचा दोन दिवस अगोदर खून करून मृतदेह समुद्रात टाकण्यात आला, असे शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर आले. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तिचे मिळालेले अर्धवट छायाचित्र मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीतील लॉजमालकांना पाठवले. महिलेची ओळख पटू नये म्हणून आरोपीने फोटो फाडला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. महिलेची ओळख पटावी यासाठी तिची माहिती इतर काही राज्यांतील पोलिसांनाही पाठवण्यात आली; पण ती महिला कुठेच बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवलेली नाही. अखेर ओळख पटवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी ‘आधार कार्ड’ प्राधिकरणाची मदत घेण्याचे ठरवले. बायोमेट्रिकमुळे त्या महिलेची माहिती मिळणे शक्‍य होईल. नुकतीच पोलिसांनी प्राधिकरणाकडे महिलेच्या बायोमेट्रिक ठशांसाठी मदत मागितली; पण प्राधिकरणाने मदत करण्यास नकार दिला. तीन महिन्यांपासून महिलेचा मृतदेह सेंट जॉर्जेस रुग्णालयातील शवागारात आहे. मृतदेह नेण्यासाठी डॉक्‍टर तपास अधिकाऱ्यांना सतत विचारणा करत आहेत. तपास अधिकारी द्विधा मनस्थितीत आहेत. 

तेव्हाही नकार
गतवर्षी कुरारमध्ये एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्राधिकरणाची मदत मागितली होती. तेव्हाही प्राधिकरणाने मदत करण्यास नकार दिला होता. तपासात आता प्राधिकरणाकडून मदत न मिळाल्यास पोलिस ‘आधारविना’ झाले आहेत.

Web Title: helpless police aadhav card