मुंबईत 490 शाळाबाह्य मुले? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

मुंबई : मुंबईत फक्त 490 शाळाबाह्य मुले असल्याचे पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात समोर आले; परंतु मुंबईत स्थलांतरित मुलांची संख्या जास्त असल्याने प्रत्यक्षातील आकडा हजारांमध्ये आहे. या शाळाबाह्य मुलांना न्याय देण्यासाठी पालिकेविरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याची माहिती शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दिली. 

एका दिवसात मुंबईत पालिकेने घेतलेल्या सर्वेक्षणाबाबत शिक्षकांमध्ये नाराजी होती. दरवेळी शिक्षकांना हाताशी धरून शाळा संपल्यानंतर शाळाबाह्य मुले शोधून त्याच दिवशी त्याला दाखल करण्याची कसरत केली. तरीही प्रत्यक्षात आकडेवारी समोर येण्याची शक्‍यता कमीच असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले होते. त्यात फक्त 490 मुलांची आकडेवारी समोर येणे हे हास्यास्पद असल्याचे सांगत कुलकर्णी यांनी सुमारे 75 हजार मुले शाळाबाह्य असल्याचे सांगितले. 

"टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' या संस्थेला तब्बल 38 हजार शाळाबाह्य मुले सापडली. प्रथम संस्थेला पाच हजार मुले सापडली अन्‌ पालिकेला फक्त 490 मुले सापडली कशी, असा सवालही त्यांनी केला. यात पालिकेकडून विचारली गेलेली प्रश्‍नावली कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.

मुलगा शाळेत जातो का, असे विचारल्यावर पालकांकडून "हो' असेच उत्तर मिळणार. कित्येक शाळांमध्ये जून महिन्यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यानंतर मुले शाळेत जातात की नाही, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत प्रश्‍नावलींचा समावेश झाला नाही. या प्रश्‍नांनी खरी आकडेवारी समोर आली असती. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना वारंवार भेटून शाळाबाह्य मुलांबाबत पाठपुरावा केला; परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आता मुंबई न्यायालयात धाव घेणार असल्याचा स्पष्ट इशारा कुलकर्णी यांनी दिला. 

संस्थांची आकडेवारी हजारांमध्ये 
संस्था : मुले 

  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स 38 हजार
  • प्रथम : 5 हजार
  • महापालिका : 490 
  • कुलकर्णी यांचा अंदाज : 75 हजार
Web Title: Herambh Kulkarni to file petition against Mumbai Municipal Corporation