पोटनिवडणुकांवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेचे चार नगरसेवक अपात्र ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी त्यावर आपला हक्क सांगत न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्याबाबत निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाला संबंधित प्रभागात फेरनिवडणुका घेण्यापासून थांबवता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने पोटनिवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. 

महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या चार उमेदवारांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 76, 32, 81 आणि 28 मध्ये पोटनिवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यासंबंधित एक अधिसूचनाही नुकतीच जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले उमेदवार नितीन सलाग्रे (कॉंग्रेस), गीता भंडारी, संदीप नाईक आणि शंकर हुंडारे (सर्व शिवसेना) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

मतदार याद्यांच्या तपासणीनंतर निवडणुका 
निवडणूक आयोगाने सध्या केवळ मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. त्या प्रभागात अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र, मतदार याद्यांची तपासणी झाल्यावर निवडणुका घोषित होण्याची शक्‍यता आहे, असे निवडणूक आयोगाच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High court adjourned the by-elections