पदवीधर सेवाज्येष्ठतेचे परिपत्रक माध्यमिक विभागासाठी लागू नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

मुख्याध्यापकपदासाठी सेवाज्येष्ठता शिक्षकांच्या नियुक्तीवरून, नाहीतर शिक्षकाने बी.एड. पदवी पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 9 एप्रिल रोजी दिला आहे. 

नाशिक : मुख्याध्यापकपदासाठी सेवाज्येष्ठता शिक्षकांच्या नियुक्तीवरून, नाहीतर शिक्षकाने बी.एड. पदवी पूर्ण केलेल्या ज्येष्ठतेवरून ठरवावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 9 एप्रिल रोजी दिला आहे. 

येवला येथील काही बी.एड. पात्रताधारक शिक्षकांनी त्यांच्यावर सेवा ज्येष्ठतेबाबतच्या अन्यायाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रथम बी. एड. केलेला शिक्षकच मुख्याध्यापक पदास पात्र असेल, असा निर्णय दिला.

14 नोव्हेंबर 2017 चे शासनाचे परिपत्रक फक्त प्राथमिकसाठी लागू असल्याचे स्पष्ट करीत माध्यमिक विभागासाठी हे परिपत्रक लागू करता येत नसल्याचे नमूद केले. ऍड. प्रणीता हिंगमिरे यांनी यासंदर्भात युक्तिवाद करून अन्यायग्रस्त सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक संचालित एन्झोकेम हायस्कूल येवला येथील उपशिक्षक किशोर गोपाळ जगताप व इतरांना न्याय मिळवून दिला.

एम. इ. पी. एस. अधिनियम 1977 च्या अनुसूचित (फ) नुसार शिक्षकांचे प्रवर्ग पाडण्यात आले. त्यातील संवर्ग(क) मध्ये जेव्हा एखादा शिक्षक बी. एड. ही व्यावसायिक अहर्ता प्राप्त करतो तेव्हापासून तो संवर्ग (क) मध्ये येतो. मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय देऊन शालेय शिक्षण विभाग, खासगी व्यवस्थापन मंडळ यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिलेली आहे.

महाराष्ट्रातील काही शैक्षणिक व्यवस्थापन मंडळांनी आपल्या जवळच्या असलेल्या शिक्षकास सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती दिल्या होत्या. खऱ्या अर्थाने संस्थेतील सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकांवर हा अन्याय होता. त्यामुळे शिक्षकांनी या संदर्भात याचिका केल्या होत्या. 

Web Title: High Court Decision about Graduates Service Seniority