प्रकृतीच्या कारणामुळे विद्यार्थिनीला महाविद्यालय बदलण्यास परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

मुंबई - एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रकृतीच्या कारणामुळे सांगलीहून थेट मुंबई किंवा ठाणेमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

मुंबई - एमबीबीएसचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीला प्रकृतीच्या कारणामुळे सांगलीहून थेट मुंबई किंवा ठाणेमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

सांगलीमधील मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने ऍलर्जीमुळे त्रस्त असल्याने न्यायालयात याचिका केली आहे. याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. ऍलर्जी आणि दम्याचा आजार असल्यामुळे मुंबई किंवा ठाणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणी याचिकादाराने केली होती. एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने ठाणेमधील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला होता. यासाठी सांगलीमधील तिच्या महाविद्यालयाकडून तिला ना हरकत प्रमाणपत्रही मिळाले होते. आजारी असल्यामुळे विद्यार्थिनीला घराजवळ मुंबई किंवा ठाण्यात प्रवेश द्यावा, असा अहवालही वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला होता; मात्र राज्य सरकारकडून अशाप्रकारच्या प्रवेश प्रक्रियेला नामंजुरी देण्यात आली. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना अशा कारणांमुळे महाविद्यालयांकडून हस्तांतरण करता येणार नाही. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असा नियम नाही, अशी भूमिका सरकारकडून घेण्यात आली होती. याचिकादाराच्या वतीने ऍड. रुई रॉड्रिग्ज यांनी एमसीआयच्या नियमांमध्ये अशाप्रकारची बदली सशर्त कारणांवरुन होऊ शकते, असे सांगितले. एमसीआयच्या नियमांनुसार सयुक्तिक कारण असेल आणि संबंधित महाविद्यालयांची परवानगी असेल तर विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलण्यास प्रवेश मिळू शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद खंडपीठाने ग्राह्य मानला आणि याचिकादार विद्यार्थिनीला महाविद्यालय बदलण्यास परवानगी दिली. 

Web Title: high court permission to change the college to the girl due to nature