जळगावमधील कोरोनाबाधित महिलेच्या मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाने घेतली दखल; राज्य सरकारला खुलासा करण्याचे निर्देश

सुनिता महामुणकर
Monday, 28 September 2020

जळगावमधील शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित महिलेच्या संशयास्पद मृत्यूची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली.

मुंबई : जळगावमधील शासकीय रुग्णालयात कोरोना बाधित महिलेच्या संशयास्पद मृत्यूची दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. याबाबत राज्य सरकारला खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.

महागड्या वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त; मुंबई महापालिकेचे नवे धोरण; गरजूंना दिलासा

जळगाव मध्ये 82 वर्षीय महिला कोरोनावर उपचार घेत होत्या. मात्र 2 जूनला त्या रुग्णालयातून गायब झाल्याचे नातेवाईकाच्या निर्दशनास आले. त्यावर पोलिस तक्रार ही करण्यात आली. परंतु आठ दिवसानंतर त्या रुग्णालयाच्या स्वच्छता गृहात त्या मृतावस्थेत सापडल्या. हा संपूर्ण प्रकार धक्कादायक आहे. राज्य सरकारने याची चौकशी करावी. तसेच मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत विचार करावा आणि पुढील सुनावणीला माहिती द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. वृद्ध मृत महिलेचे शवविच्छेदन केले आहे का, जर आठ दिवसांनी मृतदेह मिळाला तर कदाचित उपासमार झाल्यामुळे मृत्यू झाला असेल असेही खंडपीठ म्हणाले. राज्य सरकार कडूनही याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती दिली.

अनुराग कश्यपला सात दिवसांत अटक करा; अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल

यामध्ये केलेल्या प्रतिज्ञापत्रात जळगावमधील घटनेचा तपशील देण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेल्या कारवाईची माहिती देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले असून पुढील सुनावणी ता. 5 ऑक्टोबरला निश्चित केली. तसेच कारवाई पुरेशी नाही, कुटुंबियांना दिलासा मिळेल यासाठी नुकसान भरपाई द्या, असेही निर्देश दिले.

नियमांचे उल्लंघन?
वृद्ध महिलेच्या मृत्यूबाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. एन. जे. जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. कोव्हिड19 मृतदेहवर अंत्यविधी करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांचे पालन होत नाही, असे याचिकेद्वारे सांगण्यात आले आहे.

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High Court takes cognizance of death of corona woman in Jalgaon Instructions to the State Government to disclose