सायलेन्स झोनची ऐसीतैशी 

सायलेन्स झोनची ऐसीतैशी 

मुंबई  -  सोमवारी पाच दिवसांच्या तसेच गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी शांतता क्षेत्रातही (सायलेन्स झोन) ध्वनिप्रदूषणावरील निर्बंधांच्या चिंधड्या उडवत कर्णकर्कश आवाजात सवाद्य मिरवणुका निघाल्या. माहिमचे हिंदुजा रुग्णालय व गिरगाव चौपाटीजवळील रिलायन्स रुग्णालय येथे तब्बल 80 ते 86 डेसिबल म्हणजे मर्यादेपेक्षा जवळपास दुप्पट तीव्रतेच्या वाद्यांचे आवाज "टीम सकाळ'च्या पाहणीत नोंदवले गेले. गिरगावच्या प्रार्थना समाज चौकात, तर पोलिसांकडे आवाज मोजण्याचे साऊंड मीटरच नव्हते! 

सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान सकाळ प्रतिनिधींनी गिरगावच्या रिलायन्स रुग्णालयाजवळ (प्रार्थना समाज चौक); तसेच हिंदुजा रुग्णालयाजवळ प्रत्येक विसर्जन मिरवणुकीतील वाद्यांचा आवाज किती येतो ते आपल्या मोबाईल ऍपवर तपासून पाहिले. प्रार्थना समाज चौकात वाद्यांचा आवाज 86 डेसिबलपर्यंत होता. बहुतेक मंडळे "सायलेन्स झोन'च्या पाटीकडे दुर्लक्ष करून ध्वनिप्रदूषण करीत पुढे जात होती. काही मंडळे मात्र शांतता क्षेत्र किंवा रुग्णालय असल्याची जाणीव ठेवत वाद्यवादन बंद करून पुढे जात होती. गिरगाव चौपाटीवर विसर्जनाला जाणारे बहुतेक गणपती येथूनच जातात. येथेच या रुग्णालयासह मारवाडी विद्यालय हायस्कूलही आहे. 

मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले होते. नियमानुसार शांतता क्षेत्रात दिवसा 50 व रात्री 40 डेसिबल एवढाच आवाज चालू शकतो. बंदोबस्तावरील पोलिसांकडे साऊंड मीटर नसल्याने तेही हतबल होते. "आमच्या वरिष्ठांकडे ही यंत्रे असतात. ते येतील तेव्हा आवाज मोजला जाईल', असे काही पोलिसांनी सांगितले. 

दादर चौपाटी ही शिवाजी पार्क ते हिंदुजा रुग्णालयापर्यंत पसरली असून, येथील सर्वच प्रवेशद्वारांवरून विसर्जन केले जाते. यापैकी शिवाजी पार्क परिसरात 80 ते 90 डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. अर्थात, येथे सायलेन्स झोन नाही. आजच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे नसल्याने आवाज थोडा कमी झाला, एरवी येथील आवाज 100 डेसिबलची मर्यादाही पार करतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com