काळ बनून आलेल्या मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी सुसज्ज उपचार केंद्र सुरु

काळ बनून आलेल्या मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी सुसज्ज उपचार केंद्र सुरु

मुंबई : पतंगाच्या मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांसाठी बोरीवली येथील नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी स्वयंसेवी संस्थेच्या साह्याने सुसज्ज उपचार केंद्र सुरु केले आहे. आतापर्यंत तेथे 90 जखमी पक्ष्यांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. 

मकरसंक्रांतीपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी सुरु होते. मात्र त्याचा धारदार मांजा पक्ष्यांना लागून ते जखमी होण्याच्या घटनाही घडतात. अनेकदा तर फांद्यांमध्ये अडकलेल्या मांजात लटकलेले पक्षीही दिसतात. या अशा जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी श्रीमती खुरसंगे यांनी दौलतनगरच्या समकित युवक मंडळाच्या साह्याने तेथील जैन देरासरमध्ये उपचारकेंद्र सुरु केले आहे. संक्रांतीपासून सुरु झालेले हे केंद्र हा महिनाभर सुरु राहील. 

पक्ष्यांना सोडवून आणण्यासाठी तसेच त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खुरसंगे यांनी आपले पंचवीस ते तीस कार्यकर्ते सज्ज ठेवले आहेत. विभागातील कोणाही नागरिकाने जखमी पक्ष्यांबाबत किंवा झाडातील मांजात अडकलेल्या पक्ष्यांबाबत कळवले की हे कार्यकर्ते तेथे जाऊन पक्ष्यांना सोडवतात. त्यांना उपचार केंद्रात आणल्यावर त्यांच्या जखमेवर उपचार केले जातात. त्यासाठी तेथे एक पशुवैद्यकतज्ज्ञ व त्याचा सहाय्यक सर्व वैद्यकीय सामुग्रीसह तैनात आहे. उपचार करून पक्षी बरे झाले की त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले जाते. 

झाडावर अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्याचे काम खुरसंगे यांचे कार्यकर्ते करतात, त्यासाठी ते अग्नीशामन दलाची वाट पहात नाहीत. त्याच्याकरता लागणारे शिडी, काठ्या, झेला आदी साहित्यही त्यांच्याकडे तयार आहे. पक्षी बरा होईपर्यंत त्याला उपचार केंद्रातील बास्केटमध्ये ठेवले जाते, त्याला खाणे-पिणे दिले जाते. काही पक्षी दोन दिवसांत बरे होतात, तर काहींना आठ ते पंधरा दिवस लागतात. आतापर्यंत येथून नव्वद पक्षी बरे होऊन गेले. फक्त तीन पक्षी मृत झाले असे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांनी सांगितले. याचा सर्व खर्चही मंडळ तसेच खुरसंगे दांपत्यामार्फत केला जातो. 

विभागातील नागरिकांना कोठेही पडलेला किंवा लटकलेला मांजा दिसला तर त्यांनी त्याची विल्हेवाट लावावी. अन्यथा नंतरही त्यात अडकून पक्षी जखमी होऊ शकतात. तसेच नागरिकांना जखमी पक्षी आढळले तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भास्कर खुरसंगे यांनी केले आहे. दूरध्वनी - 9867169753

high tech medical facility established in mumbai for birds injured by manjha of kites

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com