महामार्गावरील दरोड्याचा छडा ; कर्नाटकातून आठ जणांना अटक

महामार्गावरील दरोड्याचा छडा ; कर्नाटकातून आठ जणांना अटक

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्‍यावर कार अडवून आतील लोकांना मारहाण करत त्यांच्याकडील चार लाख 42 हजारांचा ऐवज चोरून पळ काढणाऱ्या आठ जणांच्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखा युनिट- 1ने छडा लावला.

आरोपींना गुलबर्गा (कर्नाटक) येथून अटक करण्यात आली. ही टोळी जनावरांची चोरी करून विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. 

ठाणे न्यायालयाने सर्व आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टोळीकडून एक कार, रोख रक्कम, पाच मोबाईल आणि जनावरांना गुंगी देणाऱ्या औषधांच्या तीन बाटल्या व इंजेक्‍शन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. टोळीचा म्होरक्‍या फरार आहे.

तक्रारदार सोहेल शेख व नौशाद शेख हे 11 सप्टेंबरला डोंगरी येथून मालाचे पैसे घेऊन कारने संगमनेरकडे जात होते. खारेगाव टोलनाक्‍यावर दरोडेखोरांनी त्यांची कार अडवून आतील लोकांना मुंब्रा बायपासवर नेत मारहाण केली होती. नंतर त्यांच्याकडील जवळपास साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला होता. 

पोलिसांनी अशी केली कारवाई 

कळवा पोलिस आणि गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना आरोपी गुलबर्गा येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने कर्नाटकातील 150 लॉजची तपासणी केली.

तेथील एका लॉजमध्ये मुंबईतील काही जण असल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवून भिवंडीत राहणाऱ्या मोजम शब्बीर शेख, अबू फैसल अन्सारी, सय्यद वाजीद सय्यद मुसा, फिरोज अकबर सय्यद यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर मोहम्मद हुसैन अब्दुल रहेमान शेख, मोहम्मद शाकीर मोहम्मद कासीम शेख आणि वाहिद शौकत शेख या तिघांना अटक केली; तर अकबर शौकत शेख याचा शोध सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com