हायस्पीड वॉटर टॅक्सीकडे मुंबईकरांची पाठ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Taxi

चहुबाजूंनी निळाशार समुद्र, उफाळणाऱ्या लाटा अशा वातावरणात खऱ्या अर्थातने मुंबईकरांना समुद्रसफारीचा मनमुराद आनंद लुटता यावा याकरिता फेब्रुवारी 2022 पासून हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली.

हायस्पीड वॉटर टॅक्सीकडे मुंबईकरांची पाठ!

- नितीन बिनेकर

मुंबई - चहुबाजूंनी निळाशार समुद्र, उफाळणाऱ्या लाटा अशा वातावरणात खऱ्या अर्थातने मुंबईकरांना समुद्रसफारीचा मनमुराद आनंद लुटता यावा याकरिता फेब्रुवारी 2022 पासून हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली.

पावसाळा वगळून गेल्या पाच महिन्यात हायस्पीड वॉटर टॅक्सी 4 हजार 399 प्रवाशांनी प्रवास केला. त्यात मुंबईकर प्रवाशांची संख्या केवळ 91 असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. हायस्पीड वॉटर टॅक्सीला एलिफंटा आणि नेरुळमधील प्रतिसाद मिळाला असला तरी, मुंबईकर प्रवाशांनी हायस्पीड वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवल्याचे आकडेवारीतून दिसते आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांकडून जलवाहतुकीला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत आहेत. मात्र, पाहिजे ते यश शासनाला येत नाही आहे.

भाऊचा धक्का ते बेलापूर आणि बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते नेरुळ या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवां सुरु आहे. बेलापूर ते एलिफंटा मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र, भाऊचा धक्का ते बेलापूर दरम्यान चालणाऱ्या वॉटर टॅक्सीला मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने 60 सीटर हायस्पीड वॉटर टॅक्सी बंद पडली आहे. तसेच इतर मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.

फेब्रुवारी ते जून 2022 मध्ये भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते एलिफंटा आणि बेलापूर ते नेरुळ या मार्गावर 389 हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या फेऱ्या झाल्या आहे. त्यामधून 4 हजार 399 पर्यटकांनी आणि प्रवाशांनी वॉटर टॅक्सीतून समुद्रसफारीचा आनंद लुटला आहे. विशेष म्हणजे बेलापूर ते एलिफंटा 3 हजार 899 प्रवासी, बेलापूर ते नेरुळ या मार्गावर वॉटर टॅक्सीतून 409 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर मुंबई ते बेलापूर फक्त 91 प्रवाशांनी वॉटर टॅक्सीतून प्रवास केलेला आहे.

मुंबई ते बेलापूरला दरम्यान चालणाऱ्या हायस्पीड वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या शुन्य प्रतिसादामुळे अवघ्या काही दिवसांत बंद पडली. आता मंगळवारपासून 200 आसन क्षमताची अत्याधुनिक हायस्पीड वॉटर टॅक्सी सुरू केली. मात्र, तिकिट दर जास्त असल्याने प्रवाशांनी या बोटीकडे पाठ फिरवली आहे. सरकराचा नियोजन शून्य कारभरामुळे वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल ठरताना दिसून येत आहे.

महिना - वॉटर टॅक्सी फेऱ्या - प्रवासी

फेब्रुवारी- 37 - 402

मार्च- 121 - 1202

एप्रिल- 60 - 650

मे- 128 - 1616

जून - 43 - 529

-----------------------------------

एकूण - 389 - 4 हजार 399

मागणीकडे दुर्लक्ष -

विशेष म्हणजे, जलवाहतुकीचे सुविधा अभावी आणि शासनाने लादलेला विविध करामुळे जलवाहतुकीचे तिकीट भाडे भरमसाठ होते. तसेच भाऊचा धक्का आणि डोमेस्टीक क्रूझ टर्मिनसवरून हायस्पीड वॉटर टॅक्सी चालविण्यात येतात. मात्र, डोमेस्टीक क्रूझ टर्मिनसवर पोहचण्यासाठी प्रवाशांसाठी नियमितपणे बसेस नसल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि प्रवासी समुद्रसफारीचा आनंद लुटण्यापासून वंचित राहत होते. अनेक हायस्पीड वॉटर टॅक्सी सेवा गेट वे ऑफ इंडियापासून सुरू करण्याची मागणी वॉटर टॅक्सी मालकांकडून करण्यात आली; मात्र,आद्यपही शासनाने मान्यता दिलेली नाही. सरकराचा या नियोजन शून्य कारभरामुळे वॉटर टॅक्सी प्रकल्प फेल ठरताना दिसून येत आहे.

वॉटर टॅक्सीला सबसिडी द्या...

देशात गोवा, कोलकाता व कोचिनमध्ये सर्वाधिक जलवाहतूक होते, कारण सबसिडी दिली जाते. सध्या मोठ्या आकारच्या वॉटर टॅक्सीला अजूनही प्रतिसाद मिळत नाही. प्रवाशांना खात्रीशीर पर्यायी वाहतूकीचा मार्ग आणि तिकीट दर कमी असल्यास प्रवासी वॉटर टॅक्सीतुन प्रवास करेल. जलवाहतूकीला सबसिडी दिल्यास तिकीटदर कमी होईल. त्यामुळे शासनाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याची माहिती मुंबई पोस्ट ट्रकचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सकाळला दिली आहे.

टॅग्स :waterMumbaitaxiSeaticket