यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही : हितेंद्र ठाकूर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

ही माझी शेवटची निवडणूक असून यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्याऐवजी माझा सक्षम कार्यकर्ता, आमदारकी लढवेल, असे उद्‌गार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काढले.

विरार (बातमीदार) : ही माझी शेवटची निवडणूक असून यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. माझ्याऐवजी माझा सक्षम कार्यकर्ता, आमदारकी लढवेल, असे उद्‌गार आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काढले. विरार येथील विवा महाविद्यालयात बहुजन विकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. 

हितेंद्र ठाकूर म्हणाले, राजकारण कसे नसावे, याचा अनुभव या निवडणुकीत आम्ही घेतला. विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी गोळ्या, दहशत, जेल व अन्य विषयावर झालेला प्रचार, हा क्‍लेशकारक होता. माझ्या पत्नीला या निवडणुकीत जो मनस्ताप सहन करावा लागला, त्यामुळे मी या निर्णयापर्यंत आलो आहे. आम्ही वसई, नालासोपारा व बोईसर या तिन्ही जागा 100 टक्के जिंकणारच आहे. या वेळी सेना-भाजपसह सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केले. या उमेदवाराने मुंबईतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्रचारासाठी आणल्यामुळे शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते घराबाहेर पडले नाहीत. कोणी कितीही फुशारक्‍या मारू देत; पण लोक आमच्यावर भरभरून प्रेम करतात. त्यामुळे आम्हाला विजयाची नेहेमीच खात्री असते. वसईला बदनाम करण्याचे काम या निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडून झाले. 

पायाला भिंगरी लावून फिरणार 
या पाच वर्षांत एकही विकासकाम प्रलंबित राहणार नाही. त्यासाठी मी पायाला भिंगरी लावून गावागावात फिरणार आहे. वसई तालुक्‍याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून रुग्णालये, शाळा व अन्य विकासकामे येणाऱ्या काळात शिल्लक राहणार नाहीत, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. 

राजकारण जरूर करावे; पण इतक्‍या खालच्या पातळीवर जाऊन करता कामा नये. या सर्वांचा अक्षरश: उबग आला असून त्यामुळेच निवडणुकीचे राजकारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 
- हितेंद्र ठाकूर, आमदार, बहुजन विकास आघाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hitendra Thakur No longer in election