
Viral Video: 50 खोके, जनतेला धोके, पुढारी एकदम ओके! मुंबईतल्या होळीची सर्वत्र चर्चा
मुंबई : होळीनिमित्त मुंबईतील विलेपार्ले इथं ५० खोक्यांची होळी तयार करण्यात आली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरलं झाला आहे. होळीच्या सणानिमित्त राजकीय टोलेबाजी यानिमित्त करण्यात आली आहे. नवयुग तरुण मंडळाच्या होळीचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. (Holi 2023 50 boxes Holi video of Vile Parle is widely Viral on social media)
शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं!
शिवसेनेत बंड केलेल्या पन्नास आमदारांना डिवचण्यासाठी विरोधकांनी वारंवार उल्लेख केलेली 'पन्नास खोके, एकदम ओके' ही घोषणा प्रसिद्ध झाली आहे. हाच धागा पकडून विलेपार्ले येथील बामणवाडामधील नवयुग तरुण मंडळानं होळीनिमित्त ५० खोक्यांचा मनोरा रचला आहे. विशेष म्हणजे या प्रत्येक खोक्यावर जनतेला भेडसावत असलेले प्रश्न मांडण्यात आले आहेत.
महागाईचा मुद्दा ऐरणीवर
यामध्ये गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, अदानी प्रकरण, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, विजेचं वाढतं बिल, बेरोजगारी, जीडीपी, रुपयाची घसरण असे अनेक मुद्दे यातून उपस्थित करण्यात आले आहेत. पन्नास खोक्यांवर या विषयीचे स्टिकर चिकटवून त्याचा मनोरा उभारण्यात आला आहे. तसेच हे सर्व प्रश्न जाळून जनतेला दिलासा मिळावा असा संदेशही यातून देण्यात आला आहे.