मोबाईल व्हॅनच्‍या माध्‍यमातून घरपोच पुस्तके!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

पुस्तक मोबाईल व्हॅनला वाचकांचा अधिक प्रतिसाद मिळाल्यास फेऱ्या वाढवण्यात येतील. तसेच इतर विभागातून मागणी आल्यास त्या ठिकाणी ही सेवा देण्यात येईल. दर आठवड्याला नवीन पुस्तकांचा संच उपलब्ध केला जाणार आहे.
- प्रमोद महाडिक, कार्याध्यक्ष, नॅशनल लायब्ररी.

मुंबई - वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तके थेट वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम वांद्रे येथील नॅशनल लायब्ररीने हाती घेतला आहे. लायब्ररीने नुकतीच मोबाईल पुस्तक व्हॅन सुरू केली असून ती वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरातील वाचकांपर्यंत पोहोचणार आहे. या व्हॅनमध्ये दोन हजार पुस्तकांचा संग्रह आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा चार भाषांतील कथा, कादंबरी, चरित्र असे विविध साहित्य या व्हॅनमध्ये उपलब्ध आहे. आठवड्यातून एक दिवस ही व्हॅन परिसरात फिरते. या पुस्तक मोबाईल व्हॅनचे सदस्यत्व अवघ्या १०० रुपये प्रतिमहिना घेता येईल. आतापर्यंत ४० सभासद मिळाल्याचे नॅशनल लायब्ररीचे कार्याध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना शुल्कात २० टक्के सवलत दिली आहे. या व्हॅनमधील पुस्तक वाचक घरी घेऊन जाऊन शकतात आणि पुढच्या वेळी परत करू शकतात. तसेच आवडत्या पुस्तकाची नोंदणीदेखील वाचकांना करता येईल, त्यानुसार ते पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल, असे महाडिक म्हणाले. 

सध्या या व्हॅनची फेरी वांद्रे बीकेसी फॅमिली कोर्ट, माहीम शीतला देवी मंदिरमागे, बॅण्ड स्टॅण्ड, सांताक्रूझमधील शास्त्री नगर, खार मधु पार्क, वांद्रे पूर्वमध्ये निर्मल नगर या ठिकाणी आठवड्यातून एकदा सुरू आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - ८९२८६०५७८३


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Delivery Book by Mobile Van